वॉशिंग्टन – सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना या दौऱ्यात वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने त्यांची साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. त्यातच रविवारी एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांना फजितीला सामोरे जावे लागले.
रविवारी एका ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात इम्रान खान भाषण करत असताना एका बलुचिस्तानी तरुणाने उभे राहून जोराजोरात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
मात्र हा प्रकार सुरू असताना इम्रान खान यांनी आपले भाषण थांबवले नाही. पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांच्या स्वागताला अमेरिकन सरकारच्या प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात असून इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानाने सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयने ट्विट केल्यानंतर खान यांची ट्विटरवर बरिच खिल्ली उडवली गेली आहे.