भाष्य: गुरूशिष्य परंपरा जपणारी व्यासपौर्णिमा

विलास पंढरी

आषाढातील पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांना मानवंदना दिली जाते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी गुरूकुलात शिक्षण घेत असत.गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजन करून गुरूदक्षिणा देत असत. चारही वेदांवर प्रभुत्व असणाऱ्या व्यास ऋषींची म्हणजेच आद्यगुरूची गुरूपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे.

गुरू शिष्य नाते प्रेमाचे, विश्‍वासाचे आणि श्रद्धेचे असते. पुरातन काळापासून याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. एकलव्य आपल्या गुरूंचा-द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्या शिकला, एवढेच नव्हे तर आपल्या गुरूवरील श्रद्धेने त्या काळातील सर्वोत्कृष्ट धनुर्धारी ठरला. “गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णूः गुरूर्देवो महेश्‍वराः गुरूःसाक्षात परब्रह्म, तस्मैःश्री गुरुवे नमः’ गुरू हा ब्रह्मा, विष्णू एवढंच नव्हे तर तो परब्रह्म आहे अशी गुरूची महती वर्णिलेली आहे. संत रामदास म्हणतात, “गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा? आधी नमस्कार कोणाशी करावा? मला भासतो सद्‌गुरू थोर आहे, तयाचे प्रसादे श्रीरघुवीर पावे’ म्हणजे रामदास स्वामी गुरूला देवापेक्षाही मोठे मानतात. अशी गुरूची महती आहे.

द्रोणाचार्य हे तर कौरव व पांडव अशा दोघांचेही गुरू होते. तर विवेकानंद-रामकृष्ण परमहंस, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणे देता येतील.ज्याला ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा ईश्‍वर म्हटले जाते अशा केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी लिहिणाऱ्या बुद्धिमान ज्ञानदेवांनी सुद्धा आपल्या वरिष्ठ बंधूंना गुरू केले होते.

व्यासांनी लोकांना वेद शिकवले. त्यामुळेच त्यांना आद्यगुरू मानले जाते. तसेच गुरूपौर्णिमेला “व्यास पौर्णिमा’ही संबोधले जाते. गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरूंची पूजा केली जाते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे गुरू आपल्या जीवनाला, व्यक्‍तिमत्त्वाला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. विशेषतः गुरूपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरूच नव्हे, तर आई-वडील, घरातील ज्येष्ठ, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरू अशी शक्‍ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते.

वेगळ्या शब्दांत या पौर्णिमेला आपल्याला मांडता येईल. या दिवशी मन चंद्राशी जोडलेले असते आणि पूर्ण चंद्र हा पूर्णतेचे, उत्सवाचे, कळसाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी आपण ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र साजरे करतो. तसेच पूर्णचंद्र हा प्रेम, शीतलता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील जमा खर्चाचा ताळेबंद आहे. आतापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा आणि पुढील वर्षांमध्ये जे काही करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा हा दिवस आहे. या सर्वांची जाणीव होणे आणि जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करून, हे सर्व ज्ञान ज्या गुरूपरंपरेने जतन केले त्याचा उत्सव साजरा करणे म्हणजे गुरूपौर्णिमा.

साधकासाठी गुरूपौर्णिमा म्हणजे नवीन वर्षाची, संकल्पाची सुरुवात असते. कारण एक संपूर्ण वर्ष आध्यात्मिक मार्गावर असण्याचा, दिव्यत्वाच्या अभिव्यक्‍तीचा तो एक उत्सव असतो. तो आपल्यासाठी एक मार्गदर्शक तारा आहे. सूज्ञ व्यक्‍ती कधीही प्रतिक्रिया देत नाही तो प्रतिसाद देतो. गुरू किंवा सूज्ञ व्यक्‍तीच्या जागी स्वत:ला पुनःपुन्हा ठेवून आपण संयम ठेवून, अतिशय हुशारीने, करुणेने जीवनाचा आनंद घेऊ शकतो. आपण दुसऱ्यांवर निरपेक्ष प्रेम आणि सेवा केली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. आपण विचार करतो की अमूक व्यक्‍तीसाठी मी इतके केले त्या बदल्यात त्याने मला काय दिले? अशाने तुम्ही दुसऱ्या व्यक्‍तीला अशी जाणीव करून देता की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यावर मोठे उपकारच केले आहेत.

मात्र, तुम्ही असे करता कामा नये. प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. हे सन्मानाने, नैसर्गिकपणे, करुणेने आणि साधेपणाने झाले पाहिजे. खरे तर आपल्यात जन्मत:च हे गुण आहेत. आपल्यातील सर्व गुण-दोष समर्पित करा, पोकळ आणि रिक्‍त होऊन जा. गुरुतत्त्वाच्या आणखी जवळ येण्यासाठी आपल्याला हेच करायला हवे.

गुरूशी एकरूप झाल्यावर आपल्याला आपल्या जीवनात कृपेचा ओघ वाढल्याचे जाणवते. जास्त कृतज्ञता म्हणजे जास्त कृपा. जास्त कृपा म्हणजे जास्त आनंद आणि जास्त ज्ञान. ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. या पृथ्वीवर लाखो वर्षांपासून अनेक ऋषी, गुरू आणि संत होऊन गेले, भविष्यातही अनेक होतील. त्या भूतकाळातल्या, सध्याच्या तसेच भविष्यात होणाऱ्या सर्वांचे ज्ञानाचा स्रोत चालू ठेवण्याबद्दल आपण आभार मानायला हवेत.आध्यात्मिक ज्ञानाने आपल्या जीवनात झालेले परिवर्तन बघून आपल्याला कृतज्ञ वाटते.

आपल्या चेतनेत जेव्हा गुरूतत्त्व येते तेव्हा जीवनात ज्ञान, विवेक यांचा उदय होतो. सर्व परिसीमा गळून पडतात, भोवतालच्या सर्वांबद्दल आणि संपूर्ण विश्‍वाबद्दल एकत्व आणि ममत्व वाटते. तेव्हा त्याला गुरूतत्त्व म्हणतात. जेव्हा आपण पूर्णपणे निरिच्छ होऊन जातो तेव्हा जीवनात गुरूतत्त्वाचा उदय होतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यासाठी काही करावे असे कधी तरी वाटते का? मग तुम्ही गुरूची भूमिका बजावली आहे, असे समजायला हरकत नाही.

आई ही सर्वांत पहिली गुरू. त्यानंतर वडील, बरोबरचे इतर नातेवाईक आणि नंतर शिक्षक आपल्या जीवनात येतात. सर्वांत मोठा गुरू म्हणजे अनुभव, जो आपल्या जन्मापासून जीवनाच्या अंतापर्यंत आपल्याला साथ देतो, शिकवत असतो. सद्‌गुरू आपल्याला सत्याचे पराकोटीच्या वास्तवाचे, आध्यात्मिक ज्ञान देतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, हे ज्ञान मिळायच्या आधी माझी अवस्था कशी होती? आता माझ्यात सकारात्मक बदल झाला आहे का? पूर्वी या ज्ञानाशिवाय आपण कुठे होतो? यातले वैधर्म्य लक्षात आले की आपल्यात कृतज्ञता भाव येतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)