सुखावणारा गारवामहाबळेश्वरला पर्यटकांचा बहर
महाबळेश्वर – महाबळेश्वर सध्या पर्यटकांच्या गर्दीने बहरले असून उन्हाळी सुट्टीच्या हंगाम हा अखेरच्या टप्प्यात आल्याने महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठसह येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. देशात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना महाबळेश्वर मात्र याला अपवाद ठरले आहे. ऐन उन्हाळ्यात देखील पहाटेच्यावेळी दाट धुके व सुखावणारी थंडी पर्यटकांना अनुभवयास मिळत आहे. वातावरणातील या बदलाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.
उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी होत असून प्रेक्षणीय स्थळांइतकीच निसर्गाची विविध रूपे पाहण्यात पर्यटक मश्गुल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून देशभरात एकीकडे प्रचंड उकाडा जाणवत असताना महाबळेश्वर मात्र याला अपवादच ठरल्याचे सध्याचे चित्र आहे. शहर व परिसरात सर्वत्र सायंकाळनंतर दाट धुके पसरत असून हवेत सुखावह गारवा जाणवत आहे. यामुळे पर्यटक या बदलणाऱ्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. येथील विल्सन पॉईंटवर वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या ढगांसारखे धुक्याचे लोट पाहून पर्यटक भारावून जात आहेत.
असंख्य पर्यटकांसह स्थानिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होताना दिसत आहे. थंड हवेच्या या पर्यटनस्थळी विविध राज्यांमधून विशेषत गुजरात राज्यामधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या येथे अधिक असते. सध्या येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक, प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर सह, विल्सन पॉईंट, मुंबई पॉईन्ट, लॉडविक पॉईंट, केट्स पॉईंट या मुख्य प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांनी गर्दी होत असून काही हौशी पर्यटक कॅननॉट पीक, प्लेटो सारख्या हिरवाईने नटलेल्या पर्यटनस्थळांवर वेळ घालविताना पाहावयास मिळत आहेत.