विविधा: अण्णा हजारे

माधव विद्वांस

ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबुराव तथा अण्णा हजारे यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म 15 जून 1937 रोजी भिंगार, अहमदनगर येथे झाला.त्यांची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्या आत्याने त्यांची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्यांना मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून त्यांनी शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले.

इस 1962च्या सुमारास भारत-चीन युद्धात भारतीय सैन्याने भरती सुरू केली होती, त्यावेळी 25 वर्षांचे किसन सैन्यात भरती झाले. सुरुवातीच्या प्रशिक्षणानंतर त्यांना 1963मध्ये त्यांची वाहनचालक म्हणून नियुक्‍ती झाली. दरम्यान चीनबरोबर युद्धबंदी झाली. त्यानंतर दोन वर्षांतच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचा मुक्‍काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. 12 नोव्हेंबर 1965 रोजी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. अण्णा त्यावेळी तांड्यातील इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली.
दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती “राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन’ हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. त्यानंतर त्यांनी संत चरित्रे व समाजधुरिणांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली.

समाजासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या भावनेने 1978मध्ये भारतीय लष्कराचा राजीनामा दिला व राळेगणसिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. कायम दुष्काळी भागात असलेल्या गावातूनच त्यांनी आपले कार्य सुरू केले. महात्मा गांधीजींच्या “खेड्याकडे चला’ या घोषणेप्रमाणे गावाच्या विकासाला वाहून घेतले व राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव म्हणून नावारूपाला आणले.

शेतकऱ्यांना नोकरशाहीकडून साध्या साध्या गोष्टीसाठी पडणारा त्रास पाहून अण्णा व्यतीत झाले व भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आघाडी उघडली. भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांनी अनेक आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. आतापर्यंत 16 उपोषणे केली. गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी 1980 साली पहिले यशस्वी उपोषण केले व शासनाने अण्णांची शाळेची मागणी मान्य केली.

अण्णांचे सप्टेंबर 2011 मधील उपोषण अभूतपूर्व होते. यावेळी मीडियाने या आंदोलनाची दखल घेतली. संपूर्ण देशभरात अण्णांच्या नावाची टोपी घालून, गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, “कॅन्डल मार्च’ काढून लहानथोरांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्‍कम पाठिंबा दिला. 1990 साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि 1992 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)