लावलेल्या आगीत 33 जणांचा मृत्यू
टोकियो- जपानच्या क्योटो शहरातील एका प्रसिद्ध ऍनिमेशन स्टुडीओच्या तीन मजली इमारतीला एका अज्ञाताने लावलेल्या आगीत 33 जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 41 वर्षीय अज्ञाताला तात्काळ ताब्यात घेण्यात यश आले. मात्र, त्याने का आग लावली याचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक अज्ञात व्यक्ती स्टुडीयोच्या कार्यालयात घुसला आणि त्याने अग्निजन्य पदार्थ फेकून आग लावली. यावेळी स्टुडीयोच्या इमारतीत 70 कर्मचारी उपस्थित होते. काही वेळातच ही आग भडकली. काही कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. यावेळी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ट्विटकरून या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आबे म्हणाले की, ही दुर्घटना खूपच वेदनादायी आहे. यात अनेक जणांनी आपले प्राण गमावले, तर अनेक जण जखमी आहेत. मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली व जखमींना लवकर बरे वाटावे, अशी पार्थना करतो.