पशुसेवा ही ईश्‍वरसेवाच !

संजय गुगळे : जनावरांची मोफत आरोग्य तपासणी

नगर: पशुसेवा ही ईश्‍वरसेवाच आहे. मुक्‍या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य असून, आनंदऋषीजींनी मानवतेचा संदेश देऊन पशु-प्राण्यांना दया दाखविण्याचा उपदेश केला. त्यांच्या विचारधारेवर पशुंची सेवा चालू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच पशुपालकांना पालीव प्राण्यांच्या आरोग्याची निगा राखण्याचे आवाहन केले. डॉ.जे.के. तिटमे यांनी पशु-पक्ष्यांना मनुष्यांना प्रेम व आपुलकीने वागविल्यास त्यांचे जीवन सुकर होणार आहे. डॉ.सुनिल तुंभार यांनी जनावरांना आपुलकीने वागविल्यास जीवनात पुण्य मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. डॉ.एल.बी. भांगरे यांनी 21 वर्ष शिबीराच्या माध्यमातून चालू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या स्मृतीदिनानिमित्त जायंट्‌स ग्रुप ऑफ अहमदनगर व पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व प्रकारच्या जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारच्या जनावरांना ऍन्टी रेबीज, व धनुर्वातचे लसीकरण करुन जंत प्रतिबंधक औषधे मोफत देण्यात आले.

आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या शिबीराचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एल.बी. भांगरे, जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंभारे, जायंट्‌स इंटरनॅशनलचे संचालक तथा कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख संजय गुगळे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.जे.के. तिटमे, डॉ.विनय शहा, जिल्हा केमिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे, नूतन गुगळे, वैशाली मुथा, अभय मुथा, अनिता मुथा, दीपक मुथा, विद्या तन्वर, दर्शन गुगळे, पराग गांधी, विपुल शहा, पूजा पाथुरकर, डॉ.संतोष गायकवाड, डॉ.फुलसौंदर, दिलीप किरवे, धनेश पाटील, अनिल मैद आदि उपस्थित. प्रास्ताविकात रेणुका कुलकर्णी यांनी जायंट्‌स ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देवून, उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. शिबिरात डॉ.अनिल बोठे, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.सुनील सानप आदिंसह पशुधन विकास अधिकारी यांनी 175 जनावरांची तपासणी केली. शिबीरात घोडे, गाई, म्हशी, बैल, कुत्रे, मांजर आदिंचा समावेश होता. अजय मेडिकलचे संचालक दर्शन गुगळे यांनी जनावरांसाठी मोफत औषधे उपलब्ध करुन दिले , तर शिबीरासाठी बी.एम. ऍग्रोवेट, वीरबॅक, व्हेटोक्वीनॉल आदी औषधी कंपन्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल गांधी यांनी केले. उपस्थितांचे आभार जायंट्‌सच्या सचिव मोनिका गांधी यांनी मानले.ंतसेच जायंट्‌स ग्रुपच्या वतीने पांजरपोळ संस्थेत चारा व औषध वाटप, जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. तर महानुभव आश्रम येथे वृक्षरोपण करण्यात आले. तसेच आनंदधाम येथे रक्तदान शिबीरात जायंट्‌सच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)