तात्काळ प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार

अकोले – राज्यातील 25 हजार अंगणवाडींसाठी आर्थिक बजेटमध्ये वाढ करा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्ष सत्यभामा तिटमे यांनी आज दुपारी दिला. विविध मागण्यांसाठी आज या अंगणवाडी कर्मचारी सभेने अकोले शहरातून मोर्चा काढला होता.

शहारातील प्रमुख रस्त्यावरून गेलेल्या या मोर्चात सहभागी आंदोलकांनी विविध घोषणा देत शहर दणाणून सोडले. शहरातील रस्त्यावरून गेलेल्या या मोर्चाचे पंचायत समिती कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. या वेळी तिटमे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली.राज्य सरकार 25 हजार अंगणवाड्या बंद करण्याचे कुटील राजकारण खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला.

गेले अनेक वर्षे या विभागासाठी आर्थिक तरतूद वाढवली गेलेली नाही. याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज स्पष्ट करून जर तसे घडले नाही. तर यानंतर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असे जाहीर केले. पूजा घाटकर, इंद्रायणी भांगरे, विमल कानवडे, शांताराम गोसावी, सुशीला आरोटे, अनुसया वराडे आदींची भाषणे झाली.आंदोलकांनी गटविकास अधिकारी व प्रकल्पाधिकारी यांना निवेदन दिले. त्यात अंगणवाड्यांसाठी आर्थिक बजेट वाढवले जावे. थकीत टीए बिल तातडीने दिले जावेत, सेवा निवृत्त सेविकांना पेन्शन मिळावी, या मागण्यांचा त्यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)