मेक्सिको सिटी: डाव्या विचारसरणीचे ऍन्द्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी शनिवारी मेक्सिकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मेक्सिकोमध्ये अध्यक्षपदासाठी पाच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणूकीमध्ये ओब्राडोर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला होता. “एएमएलओ’ या अद्याक्षरांनीच ओब्राडोर यांची ओळख होते. संसदेमध्ये गेल्या 89 वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता अस्तित्वात होती. मात्र 1 जुलै रोजी ओब्राडोर यांनी निवडणूकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवले. देशात वाढत असलेला गुन्हेगारी, दारिद्रय आणि भ्रष्टाचार समाप्त करण्यासाठीच्या नवीन दृष्टीकोनामुळे ओब्राडोर यांचा विजय झाला होता.
हुकुमशाही आणि कट्टरवादी दृष्टीकोन असलेल्या ओब्राडोर यांनी निवडणूकीपूर्वी लोकप्रिय धोरणांची घोषणा केली होती. मात्र या घोषणा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अध्यक्षपदाच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर ओब्राडोर तातडीने मेक्सिको सिटी येथील शानदार समारंभाला हजेरी लावण्यासाठी रवाना झाले.
मेक्सिकोमधील ड्रग माफिया, टोळी युद्ध आणि सीमेवरून 6 हजार शरणार्थ्यांचा अमेरिकेतील प्रवेश रोखणे हे त्यांच्यासमोरील तातडीची कर्तव्ये आहेत. गुंतवणूक धोरणाला चालना देऊन संतुलित अंदाजपत्रक मांडण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा