आणे पठारभागावर कुपनलिकाही बंद

या पठार भागावरील शेतकऱ्यांवर यावर्षी दुबार पेरणीच संकट आलं होत. दुबार पेरणी करूनही फायद्याऐवजी शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागले. जूनमध्ये झालेल्या थोड्या पावसावर पेरण्या करून लाखो रुपयांचे खत-बी शेतात पेरले होत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाअभावी गेल्याने असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीमलाला बाजारभाव नसल्याने तालुक्‍यातील शेतकरी हैराण आहे. परिसरातील गावांत शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, बाजरी, मूग, उडीद, हरबरा,मठ, तूर, सोयाबीन, कांदे, टोमॅटो आशा विविध पिकांची लागवड व पेरणी केली होती; पण पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक
नुकसान केलं.

रामदास सांगळे

आणे – येथील पठार भागावर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या भागात टॅंकर सुरू झाले असले तरी पुरेसं पाणी नागरिकांना मिळत नाही. पठार भागावरील तलाव गेल्या वर्षीच्या पावसाळ्यापासून कोरडे पडले आहेत, विहिरींनीही पाणी नाही, तर अनेक कूपनलिका बंद पडल्या आहेत.आनंदवाडी, पेमदारा, नळवणे, भोसलेवाडी, कारेवाडी, सुरकुलवाडी, शिंदेवाडी, वरूनडे, अणे, माळवाडी वस्ती, तरळदारा, गोडेशेत, संभेराव वस्ती, हनुमान दरी, चिखल ओहळ, आंद्रे वस्ती, दाते मळा, चौघुले मळा, भटमोळी आदी भागातील नागरिकांना आणि पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. जनावरांसाठी चाराही जास्त मोबदला देऊन खरेदी करावा लागत आहे.

आणे घाटातील गणेश पाझर तलाव वर्षभर कोरडा
पाऊस नसल्याने आणे घाटातील गणेश पाझर तलाव कोरडाच राहिला. या तलावावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे; पण तालावात पाणीच नसल्याने बळीराजा हताश झाला. या भागात मोठ्या प्रमाणात पाळीव आणि अन्य वन्य प्राणी आहेत. त्यांचीही पाण्याची सोय या तलावातून होत असते. याबरोबरच तलावाने आणे घाटाच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली आहे; पण तलाव कोरडा असल्याने घाटाचे सौंदर्य नाहीसे झाले आहे.

घाटात निसर्गसौंदर्याकडे पर्यटकांची पाठ
आणे घाटात मोठा नैसर्गिक पूलही आहे. या पुलाजवळच मळगंगा मातेचं मोठं मंदिर आहे. सर्व परिसर निसर्गरम्य आहे. पावसाळ्याच्या काळात येथील धबधब्याकडे अनेक पर्यटक येतात; परंतु या वर्षी धबधब्याचे पाणी वाहिलेच नाही. पर्यायाने पर्यटकही इकडे फिरकले नाहीत.

गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच टॅंकर आहे, त्यामुळे अपुरे पाणी मिळत आहे. ग्रामपंचायतीने अजून एका टॅंकरची मागणी मागील महिन्यात केली होती; परंतु अद्याप दुसरा टॅंकर सुरू झालेला नाही. नेते मंडळींनी आमच्या भागात दौरे केले; पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

-रंगनाथ बेलकर, सरपंच पेमदरा.

अणे परिसरात टॅंकर चालू झाल्याने पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे; परंतु जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे. चारा छावणी सुरू करावी किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात चाऱ्यासाठी सरकारने रक्कम द्यावी. शेतकऱ्यांच्या जनावरांची नोंद गावातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे, त्यामुळे जनावरांच्या संख्येने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी.

– श्रीप्रकाश बोरा, सरपंच, आणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)