…अन् कार्तिकला सेटवरच रडू कोसळले

कार्तिक आर्यनने नुकतेच “लव्ह आज कल 2’चे शुटिंग संपवले. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या या सिनेमामध्ये कार्तिक आणि इम्तियाझ अली पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. हा अनुभव कार्तिकसाठी निश्‍चितच स्पेशल अनुभव होता. त्यामुळेच कार्तिकला शुटिंगच्या अखेरच्या दिवशी अक्षरशः रडू कोसळले. सेटवरच त्याने इम्तियाझ अलीच्या गळ्यात पडून आपल्या अश्रुंना वाट करून दिली. या हृद्‌य घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. इम्तियाझ अली आणि कार्तिक आर्यनमधील बॉन्डिंग या व्हिडीओमधून सहज दिसून येते. या दोघांमधील घट्ट मैत्रीचे दर्शन बघून सेटवरच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळले.

केवळ इम्तियाझ अलीबरोबरच नव्हे तर “लव्ह आज कल 2′ सिनेमासाही कार्तिकसाठी खूप स्पेशल आहे. त्यातील त्याचा रोल प्रथमच अत्यंत परिपक्‍व आणि सुंदर आहे. या रोलसाठी कार्तिकला स्वतःमध्ये खूप बदल करावा लागला. वेगवेगळ्या वेशभुषेमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्येही त्याला शुटिंग करावे लागले. नवी दिल्ली, उदयपूर, मुंबई आणि हिमाचल प्रदेशात “लव्ह…’चे शुटिंग झाले आहे. शुटिंगच्या अखेरचे 66 दिवसांचे शेड्युल हिमाचल प्रदेशातल्या रम्य डोंगरांच्या सानिध्यात झाले होते. या सिनेमाच्या पहिल्या भागात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण लीड रोलमध्ये दिसले होते. आता त्याच्या सिक्‍वेलमध्ये सैफची कन्या सारा अली खानबरोबर काम करण्याची कार्तिकला संधी मिळाली, हे देखील त्याच्यासाठी स्पेशल आहे. सारा अली खानने जेंव्हापासून कार्तिकबरोबर डेट करण्याची ईच्छा व्यक्‍त केली होती, तेंव्हापासून तिच्याबरोबर सिनेमात एकत्र काम करण्यासाठी तो आतुर झाला होत. “लव्ह आज कल 2′ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)