देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व विजय – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असतानाही भाजपा-शिवसेनेच्या सरकारने केलेल्या कामगिरीवर जनता खूष होती. या समस्येतून आपल्याला महायुतीचेच सरकार बाहेर काढू शकते, हा विश्वास गेल्या साडेचार वर्षांतील कामामुळे जनतेच्या मनात होता. जनतेने दिलेला हा ऐतिहासिक कौल आहे. देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व असा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मिळवला आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा महायुतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षांचा दारूण पराभव केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या यशाला जनतेने ऐतिहासिक कौल दिला त्याबद्दल त्यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट होती. या लाटेचे सुनामीत रूपांतर झाले आणि आज ते प्रत्यक्षात उतरले, असे फडणवीस म्हणाले. देशातील मध्यमवर्गीय आणि गरिब नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर निवडून देण्यासाठी उत्सुक होता. देशात प्रो इन्कंबन्सी येणार असे मोदींनी सांगितले होते, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे, असे सांगतानाच या अभूतपूर्व विजयाबद्‌दल मुख्यमंत्र्यांनी पक्षातील सर्व सहकारी, महायुतीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले, रासपसह सर्व घटक पक्षांचेही आभार मानले.

जनतेचा कौल झोप उडवणारा
राज्यात दुष्काळी परिस्थिती असूनही जनतेने युती सरकारच्या कामावर विश्वास दाखवला आहे. दुष्काळासाठी मोदींनीही केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव मदत राज्याला केली. त्यामुळे गेल्या वेळपेक्षाही आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. मात्र, जनतेचा कौल पाहिल्यानंतर आमची झोपच उडाली आहे. जनतेच्या या प्रेमामुळे आनंद तर झाला आहेच, शिवाय आता या प्रेमानुरूप अधिक चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आमच्या समोर असणार आहे. जनतेचा कौल पाहिल्यानंतर आता पुन्हा कामांना लगेचच सुरूवात करणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)