स्वच्छतादूत मोनिकाची प्रेरणादायी कहाणी

अपर्णा देवकर

2014 मध्ये जेव्हा स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू झाले तेव्हा छत्तीसगडच्या 19 वर्षीय मोनिका इजारदारने प्रशिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्यावेळी ती कॉलेजमध्ये पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देत होती. या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा उचलत मोनिकाने 82 गावातील ग्रामस्थांच्या जीवनात कायापालट घडवून आणला. या गावातील ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असत. तिने गावकऱ्यांच्या राहणीमानात बदल घडवून आणण्याचा निर्धार केला आणि त्यास गावकऱ्यांनीही प्रतिसाद दिला. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील मोनिका इजारदार ही स्वच्छतादूत म्हणून लोकप्रिय झाली.

काही दिवसांपूर्वी अक्षयकुमारचा “टॉयलेट ः एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शौचालयाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आजही भारतात अनेक ठिकाणी दुर्गम भागात, ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याची मानसिकता रुजलेली आहे. ही मानसिकता बदलणे सोपी बाब नाही. मात्र, अशा प्रकारची मोहीम मोनिकाने यशस्वी केली आहे. मोनिकाची कहाणी प्रेरणादायी आहे.

एकदा एका ज्येष्ठ महिलेचा तिच्यासमोर भूकबळी गेला होता. कालांतराने तिला कळाले की, ती भूकेली होती. कारण तिला अपचनाचा त्रास होता. तिला कोणताच आहार पचनी पडत नव्हता. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सभोवतालचा अस्वच्छ परिसर. ती ज्या ठिकाणी राहात होती, तेथेच ती झोपायची, बसायची. नित्यकर्म करण्याची तिच एकमेव जागा असायची. स्वच्छतेकडे तिने लक्ष दिले नाही आणि परिणामी तिचा आजाराने बळी घेतला. स्वच्छतेच्या दिशेने काम करण्यासाठी हीच एकमेव घटना कारणीभूत ठरली नाही. याशिवाय अनेक घटना होत्या की, त्यातून मोनिका स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यास प्रवृत्त झाली.

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेली मोनिका 2014 मध्ये कॉलेजला असताना सेमिस्टर परीक्षेची तयारी करत होती. तेव्हा देशात मोठे राजकीय परिवर्तन झाले. नव्या सरकारने आपली महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते. यानुसार सरकारने देशव्यापी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. मोनिकाला देखील प्रशिक्षणात सहभागी होण्याची इच्छा झाली आणि तिने सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणातून आपल्या ग्रामीण भागात बदल घडवून आणू असे तिने ठरवले आहे. यासाठी मोनिकाने ग्रामस्थांत स्वच्छतेप्रती जनजागृती अभियान राबवण्याचे ठरवले. स्वच्छतेमुळे काय फायदे होतात आणि अस्वच्छतेमुळे शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहितीही तिने दिली. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, महिलेला तिने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

प्रत्येक कुटुंबांच्या भेटीगाठी घेऊन तिने शौचालयाची माहिती दिली. आपल्या घरात स्वच्छ शौचालय असणे किती गरजेचे आहे, हे पटवून दिले. मोनिकाची धडपड सर्वांना समजली आणि पुढच्या टप्प्यात तिने कमीत कमी पैशात शौचालय कसे उभारता येईल, हे काम हाती घेतले. यासाठी एखाद्या संस्थेवर किंवा सरकारवर अवलंबून राहू नये, अशी मोनिकाची इच्छा होती. लोकांनी त्याचे महत्त्व ओळखून स्वत:च्याच हिमतीवर शौचालय बांधावे यासाठी ती प्रयत्नशील होती.

पहाटेच्या वेळी महिलांनी घराबाहेर जाणे किती धोक्‍याचे असते, याबाबत पुरुष मंडळींना समजून सांगितले. घरातील अब्रू राहण्यासाठी शौचालय असणे किती आवश्‍यक आहे, हे मोनिकांने ग्रामस्थांच्या गळी उतरवले. मोनिकाच्या प्रयत्नांना यश मिळत गेले. हळूहळू जुन्या मानसिकतेचा पगडा सुटत गेला आणि गावात शौचालय उभे राहिले.

जिल्ह्यातील जवळपास 82 ग्रामपंचायतीमध्ये सुलभ शौचालय उभारणीत मोनिकांने मोलाचा वाटा उचलला. उघड्यावर शौच करण्याची घाणेरडी प्रथा बंद करण्याचा उपक्रम यशस्वी ठरला. परिणामी जिल्हा हा पूर्णपणे ओडीएफ (ओपन डेफिकेशन फ्री) म्हणून घोषित करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)