चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने वेण्णालेक बोट क्लब पूर्ववत
महाबळेश्वर – महिनाभरापासून बंद असलेल्या बोटक्लबवरून पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात अखेर महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा यांना मध्यस्थी करावी लागली. ना. पाटील यांच्या मध्यस्थीमुळे जिल्हा प्रशासनाला आपली ताठर भूमिका सोडावी लागली. त्यामुळे बोट क्लब सुरु करण्यातील मोठा अडथहा दूर झाला. तहसीलदार यांनी परवाना नूतनीकरण केल्याने अखेर एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज बोटक्लब पूर्ववत सुरू झाले.
वेण्णालेक येथे पालिकेच्यावतीने नौकाविहाराची सोय करण्यात आली आहे. नौकाविहाराचे दर भरमसाठ असले तरी येथे आलेला पर्यटक हा नौकाविहार केल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे वेण्णालेक हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. बोट क्लबपासून पालिकेला दरवर्षी सुमारे तीन कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळते. यासाठी महसूल विभागाने पालिकेला परवाना दिलेला आहे. परंतु या परवान्याचे पालिकेला दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागते. पालिकेने 2015 पासून या परवान्याचे नूतनीकरण करून घेतलेच नाही. या बाबीचा पालिकेला सोयीस्कर विसर पडला होता. 12 जून रोजी येथे एका अपघातात युवकाला आपला प्राण गमवावा लागला. तेव्हा प्रशासन खडबडुन जागे झाले.
पालिकेकडे बोटक्लब चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण झालेच नाही ही बाब उघडकीस येताच जागे झालेल्या पालिका प्रशासनाने बोटक्लब परवाना नूतनीकरणाच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान परवाना नूतनीकरण करण्यात येत नाही तोपर्यंत बोटक्लब बंद करण्याची सूचना तहसीलदार यांनी मुख्याधिकारी यांना केली. मुख्याधिकारी यांनी याबाबत कोणाला विश्वासात न घेता परस्पर बोटक्लब बंद करण्याचा निर्णय घेतला. ऐन हंगामात बोटक्लब बंद पडल्याने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. इकडे परवाना नूतनीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने पालिकेकडे मालकीबाबत कागदपत्रांची मागणी करून नवीन वादाला तोंड फोडले.
पालिकेला मालकीबाबत कागदपत्रे सादर करता न आल्याने गेली महिनाभर बोटक्लब बंद आहे. बोटक्लब बंद असल्याने पालिकेवर सर्व थरातून टिकेची झोड उठली.
अनेकांनी बोटक्लब बंद करण्याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले. बोटक्लब चालू करण्यास नगराध्यक्षा व पालिका प्रशासनाला अपयश आल्याने अखेर त्यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला. हीच बाब नगरसेवकांना खटकली. वास्तविक पाहता बोटक्बल बंद करण्याचा निर्णय सर्वांना विश्वासत घेवून घेता आला असता. परंतु, नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी परस्पर बोटक्लब बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नगरसेवकांमध्ये संतापाची भावना होती. या संतापाला गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वाट मिळाली. पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, नासिर मुलाणी व संदीप साळुंखे यांनी या विषयावरून मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते. सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे या विषयावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
दरम्यान भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील हे महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी कार्यक्रमात भाषण करताना नगराध्यक्षांनी पाटील यांचे या विषयावर लक्ष वेधले. कार्यक्रमानंतरही नगराध्यक्षांच्या दालनात या विषयावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने याबाबत आडमुठी भूमिका घेतल्याने हा विषय अधिक चिघळला. याकडे महसूल मंत्री ना. पाटील यांचे पालिकेतील सत्ताधारी गटाने लक्ष वेधले. पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतल्याने बोटक्लबमधील मोठा अडथळा दूर झाला. जिल्हा प्रशासनाने घुमजाव केल्याने आज महिन्याच्या विश्रांतीनंतर बोटक्लब पर्यटकासाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला.