विविधा : अमरीश पुरी

-माधव विव्दांस

भेदक डोळे, कपाळावर आठ्या, बोलण्यात जरब असे खलनायक म्हणजे अमरीश पुरी यांचे आज पुण्यस्मरण (निधन 12 जानेवारी 2005). त्यांचा जन्म पंजाबमधील नवानशहर येथे 22 जून 1932 रोजी झाला.आपले थोरले बंधू चमन पुरी व मदनपुरी यांच्यानंतर ते चित्रपट सृष्टीत काम मिळवण्यासाठी मुबंईत आले. परंतु स्क्रिनटेस्ट मध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर ते राज्यकामगार विमा योजनेत नोकरीसाठी रुजू झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 1957 मधे अमरीश पुरी यांचा विवाह उर्मिला दिवेकर यांचेशी झाला. उर्मिला दिवेकर नोकरीत असताना त्यांच्या सहाय्यक होत्या ते त्यांच्या प्रेमात पडले व अखेर त्या त्यांच्या सहचारिणी झाल्या. त्याचवेळी त्यांनी पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून नाटकात काम करण्यास सुरवात केली. वर्ष 1979 मधे त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला.

पृथ्वी थिएटर नंतर ते दूरदर्शन जाहिरातींमध्ये काम करू लागले आणि त्यांचा चित्रपटसृष्टीतही प्रवेश झाला. पहिल्यांदा त्यांनी वर्ष 1967 मधे “शांतता कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटात एका आंधळ्यांची भूमिका केली होती.त्यानंतर हिंदी, कन्नड, मराठी, हॉलीवूड, पंजाबी, मल्याळम, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये कार्यरत राहिले. वर्ष 1970चे सुमारास, पुरी बहुतेकदा मुख्य खलनायकाच्या सहकलाकार म्हणून काम करत असत.

वर्ष 1980 च्या सुपर-हिट फिल्म ‘हम पांच’ मध्ये त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले, ज्यामध्ये त्यांनी मुख्य खलनायक म्हणून भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी मुख्य खलनायक म्हणून ओळख निर्माण केली. वर्ष 1982 मधे पुरी यांनी सुभाष घई यांच्या ‘विधाता’ मध्ये जगवार चौधरी म्हणून खलनायक रंगविला. वर्ष 1984 मधे स्टीव्हन स्पीलबर्गच्या “इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम’मधील मोलारामची भूमिका केली होती, ती खूप लोकप्रिय झाली होती. ही भूमिका इतकी प्रभावशालीझाली की त्यांनी नेहमीच आपले डोक्‍यावरील केस साफ (चकोट) करायचे ठरविले. यामुळे त्यांना खलनायकांची भूमिका अधिक प्रभावी करता येऊ लागली.

1987 मधे प्रदर्शित झालेल्या “मिस्टर इंडिया’ मधील “मोगॅम्बो खुश हुआ’ हा त्यांचा डायलॉग खूपच गाजला. ते व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रमुखपणे काम करत असले तरी, समांतर किंवा वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या चित्रपटांवर प्रेम करत राहिले. आपल्या अभिनयातून ते प्रेक्षकांमध्ये चीड आणि संताप निर्माण करायचे. वकील, स्मगलर, राजकीय नेता तसेच चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी भूमिका छान वठविल्या तरी ते खलनायक म्हणूनच रसिकांना भावले.

“दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, “फूल और कॉंटे’, “गर्दिश’, “परदेस’, “विरासत’, ‘घातक’ आणि “चायना गेट’ अशा चित्रपटातून त्यांनी सकारात्मक भूमिकाही चांगल्या वठविल्या. अमेरिकन दिग्दर्शक स्पिलबर्ग यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये अमरीश पुरी यांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, अमरीश माझा आवडता खलनायक आहे. जगात असे खलनायक कधीच निर्माण झाले नाहीत. सुमारे 400 हून अधिक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. या अभिनेत्याला अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)