अमरीश पुरी यांच्या नातवाचीही होणार बॉलीवूडमध्ये एन्ट्री!

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त आले होते. त्यापाठोपाठ आता “मोगॅम्बो’ म्हणजेच सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्या नातवाचीही बॉलीवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याकरता सज्ज झाला आहे. दिग्दर्शक जयंतीलाल गाडा दिग्दर्शित एका रोमॅन्टिक प्रेमकथेवर आधारित चित्रपटात वर्धन पुरी भूमिका साकारणार आहे. वर्धनने यापूर्वी नाटकात काम केले आहे. त्याने “दावत-ए-इश्क’ व ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिकाही पार पाडली आहे.

जयंतीभाई यांच्याबरोबर एका पिरीएड ड्रामामध्ये तो काम करणार असे ठरले होते. मात्र काही कारणामुळे ते गणित जुळले नाही. त्यानंतर जयंती गाडा यांनी वर्धनला दुसऱ्या सिनेमाची ऑफर दिली. त्याला त्याने लगेचच होकार कळवून टाकला. यामध्ये अभिनयाला वाव असणार आहे. हॉलीवूडच्या गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर “गॉन गर्ल्स’च्या धर्तीवर हा सिनेमा असेल, असेही त्याने सांगितले. या रोलसाठी त्याचे ट्रेनिंग सुरू आहे. तो अभिनयाच्या कार्यशाळांमधून स्वतःची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्नही करतो आहे. या सिनेमासाठी दिल्ली आणि सिमल्यातील काही ठिकाणे निवडली जात आहेत. अमरीश पुरी यांच्याच मार्गदर्शनाखाली वर्धनने वयाच्या पाचव्या वर्षापासून अॅॅक्टिंग करायला सुरुवात केली होती. त्यांच्याबद्दल बोलताना वर्धनने सांगितले, की “ते माझी प्रेरणा आहेत. त्यांची मी देवासमान प्रार्थना करतो. मी त्यांच्या खूप जवळचा होता. जेव्हा त्यांचे निधन झाले होते, तेव्हा मला माझे सुरक्षा कवच हरवल्यासारखे वाटत होते. मी जे काही करेल ते त्यांच्यासाठी करेल, आणि हा चित्रपटही त्यांच्यासाठीच करणार असल्याचे तो पुढे म्हणाला’. बॉलीवूडमध्ये तसेही नवोदित कलाकारांचे पदार्पण होत आहे. आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांची मने जिंकण्यात वर्धन कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे अमरीश पुरींच्या चाहत्यांसाठी अधिक रंजक असेल.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)