अमोल कोल्हे नॉट रिचेबल; कार्यकर्ते हतबल

चार दिवसांपासून राष्ट्रवादीचा प्रचार थंडावला

पिंपरी – शिरुर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होवून ती वेग घेत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे अचानकपणे चार दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. कोल्हे शुटींगमध्ये असल्याचे कारण दिले जात असले तरी प्रचाराचे कोणतेच नियोजन होत नसल्याने कार्यकर्ते हतबल झाले आहेत. त्यातच वरिष्ठ पातळीवरूनही या गंभीर प्रकाराकडे दूर्लक्ष होवू लागल्याने या मतदारसंघातील राष्ट्रवादीचा प्रचार थंडावला आहे.

सध्या लोकसभेच्या सर्वात्रिक निवडणुकीची धामधुम देशभर सुरू आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे. शिवसेनेने खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर चौथ्यांदा विश्‍वास दाखवित त्यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमोल कोल्हे यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवरून बरीच खलबते, राजकारण, नाराजीनाट्य असा बराच प्रकार घडला. मात्र सर्व बंडोबांना शांत करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हे यांनी प्रचाराला दणक्‍यात सुरुवातही केली.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून ते अचानकपणे नॉट रिचेबल झाले आहेत. लोकसभेचा उमेदवार ऐन निवडणुकीच्या धामधुकीत अचानकच गायब झाल्यामुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चार दिवसांपासून अनेकजण कोल्हे यांना फोन करीत असले तरी साहेब शुटींगमध्ये व्यस्त आहेत, या एका वाक्‍यावरच कार्यकर्त्यांचे समाधान केले जात आहे. कधी शुटींग संपणार, प्रचार कधी सुरू होणार, नेमके नियोजन काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे कोणालाच मिळत नसल्याने अनेक ठिकाणचे कार्यकर्ते वैतागल्याचे पहावयास मिळत आहे.

सुरुवातीला कोल्हे यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता मात्र अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा विभागलेला आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील चार मतदारसंघ हे ग्रामीण तर दोन शहरी आहेत. लहाण मोठी गावांची संख्याही मोठी आहे. मतदानाला अवघ्या तीस दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना आपल्या गावात उमेदवाराचा एक तरी दौरा व्हावा, या अपेक्षिने कामाला लागलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

आताच न भेटणारे उद्या कसे भेटणार?

निवडणूक मतदान होणे बाकी आहे, ऐन प्रचाराच्या काळात जे नॉट रिचेबल होतात. शुटींगच्या नावाखाली कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटत नाहीत, ते उद्या खासदार झाल्यावर कसे भेटणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. निवडणुकीपुर्वीच कार्यकर्त्यांची ही अवस्था तर निवडणुकीनंतर मतदारांची निराशाच होईल, अशी भिती विरोधकांकडून दाखविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)