गांधीनगरमधून अमित शहांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्‍तिप्रदर्शन

उद्धव ठाकरेंसह एनडीएतील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी

गांधीनगर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (30 मार्च) जोरदार शक्तीप्रर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली उपस्थित होते.

विरोधकांचा नेता कोण – उद्धव ठाकरे
आमच्याविरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. गांधीनगरमधल्या अमित शाहांच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहनही केले. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या गांधीनगरमध्ये येण्याने अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. आमच्यात (शिवसेना आणि भाजप) मतभेद होते, पण आता आमची मने जुळली आहेत. विरोधकांप्रमाणे आमचे फक्त हात मिळालेले नाहीत, तर आमची मनंसुद्धा जुळली आहेत.

अमित शहा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी शुभ मुहूर्ताची निवड केली होती. गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शहांनी कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर नारणपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथे त्यांच्यासह इतर नेत्याची उपस्थितांना संबोधले. मग अमित शहांनी एनडीएमधील घटकपक्षांच्या नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चार किमीचा भव्य रोड शो केला.
अमित शहा म्हणाले, 1982मध्ये मी इथे बूथ कार्यकर्ता म्हणून नारणपुरा परिसरात पोस्टर आणि पत्रकं चिटकवत होतो आणि आज पक्षाचा अध्यक्ष आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, ते भाजपने दिले आहे. आज निवडणूक केवळ याच गोष्टीवर लढवली जात आहे की, देशाचं नेतृत्त्व कोण करेल? देशाच्या कानाकोपऱ्यातून मोदी-मोदी आवाज येत आहे. मोदी निश्‍चितच देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की, गुजरातच्या सर्व 26 जागा मोदींना द्या आणि त्यांना पंतप्रधान बनवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)