नवी दिल्ली -भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी इफ्तार पार्ट्यांविषयी वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना सक्त ताकीद दिली. वादग्रस्त टिप्पणी टाळण्याची सूचना शहांनी गिरीराज यांना केल्याचे समजते. भाजपचे फायरब्रॅंड नेते अशी ओळख असणाऱ्या गिरीराज यांनी एक ट्विट करताना त्यासमवेत बिहारमधील नेत्यांची छायाचित्रे पोस्ट केली.
त्या छायाचित्रांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचाही समावेश होता. स्वत:चा कर्म-धर्म सोडून लोक इतरांच्या धार्मिक विधींचा दिखावा करण्यात पुढे का असतात, अशा आशयाचा सवाल गिरीराज यांनी ट्विटद्वारे केला.
गिरीराज यांची ती कृती भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीयूला रूचली नाही. गिरीराज यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, असा इशारा जेडीयूने दिला.
तसेच, गिरीराज आमच्या मदतीमुळे लोकसभेवर निवडून गेल्याचेही त्या पक्षाने म्हटले. त्यापार्श्वभूमीवर, शहा यांनीही गिरीराज यांच्या कृतीची गंभीर दखल घेत त्यांना कानपिचक्या दिल्या.