नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली ही पहिलीच भेट आहे. तथापी ही केवळ सदिच्छा भेट होती असे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. या भेटीची स्वत: अमित शहा यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती देताना म्हटले आहे की त्यांना भेटणे ही नेहमीच आनंदाची बाब असते.
संवेदनशील मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या मंत्रालयात बैठकांचा धडाका लावला आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या सर्व आठ महत्वाच्या समित्यांमध्येही अमित शहा यांचा समावेश करण्यात आल्याने ते केंद्रातील मोदींनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटण्याच्या घटनेलाही महत्व दिले गेले आहे.