पिंपरी-चिंचवड : शहरात तीन राज्यमंत्री दर्जाची पदे

कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न; पटवर्धन, खाडे, गोरखे यांचा समावेश

पिंपरी – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित गोरखे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल तिघांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांचीही म्हाडाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेने वर्णी लावली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शहराला ही पदे मिळाल्याने शिवसेना भाजपा युतीकडून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या महामंडळावरील नियुक्‍त्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. सत्तेतील घटक पक्षांना देखील या महामंडळातील नियुक्‍त्यांमध्ये सामावून घेण्याचे भाजपने संकेत दिले होते. मात्र, महामंडळावरील नियुक्‍त्या होत नसल्याने सर्वच इच्छूक हवालदिल झाले होते. शेवटी लोकसभा निवडणुकीची आचरसंहिता जाहीर होण्यापूर्वी विविध महामंडळांवरील नियुक्‍त्या राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. यामध्ये भाजपकडून पिंपरी विधानसभेकरिता इच्छूक असलेल्या अमित गोरखे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची या महामंडळाच्या अध्यक्षपदी तात्कालीन आघाडी सरकारने नियुक्ती केली होती. महामंडळातील कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यामुळे कदम सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. तेव्हापासून हे महामंडळ एकदम प्रकाश झोतात आले होते. या महामंडळाचे सुमारे 300 कोटींचे अंदाजपत्रक असून, गोरखे यांच्या नियुक्‍तीने समाजातील वंचित घटकांना न्याय मिळू शकणार आहे.

गोरखे यांच्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची म्हाडा च्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. कलाटे यांना डावलून स्मार्ट सिटी संचालकपदी शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांची वर्णी लागल्याने ते भाजपच्या कारभारावर कमालीचे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर पुनावळे येथील चेतन भुजबळ यांचीदेखील म्हाडाच्या संचालकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

नव्याने झालेल्या या तीन नियुक्‍त्यांपूर्वीच शहराला दोन राज्यमंत्री दर्जाची पदे मिळाली आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा त्यामध्ये समावेश आहे. याशिवाय भाजपाचे नगरसेवक केशव घोळवे यांची किमान वेतन मंडळाच्या सदस्यपदी युती शासनाने वर्णी लावली आहे. शहरात एकाच वेळी राज्य शासनाची पदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दोन्ही आमदारांना मंत्रीपदाची हुलकावणी

आमदार महेश लांडगे यांची क्रीडा राज्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांचा बायोडाटादेखील मागविण्यात आला होता. त्याचबरोबर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळेल, असा अंदाज होता. मात्र, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तारच झाला नाही. त्यामुळे लांडगे यांचे मंत्रीपद हुकले. तर पंकजा मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लगली. या नियुक्‍तीमुळे भाजपाच्या निष्ठावंताला न्याय मिळाला असला तरी शहरातील दोन्ही आमदार पदांपासून वंचित मात्र राहिले.

रिपाइंसह इतर घटक पक्षांवर अन्याय

राज्य व केंद्रात शिवसेना भाजपसोबत मित्र पक्ष असल्याने, शिवसेना पदाधिकाऱ्यांनादेखील महामंडळांवरील नियुक्‍त्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना महामंडळांवरील नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या राजाभाऊ सरवदे यांच्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावरील नियुक्‍तीचा अपवाद वगळता अन्य पदाधिकाऱ्यांना संधी मिळालेली नाही. याबाबत शहर पदाधिकाऱ्यांमध्ये या नियुक्‍त्यांमध्ये अन्याय झाल्याचे चर्चा सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)