आंबेडकरांकडून प्रस्तावावर प्रतिसाद मिळत नाही

पृथ्वीराज चव्हाण : युती होणार याची खात्री होती

पुणे – बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत; पण ते आमच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहेत.आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे? हेच अद्याप समजत नसल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने देशभरात निरनिराळ्या पक्षांशी आघाडी करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर राज्यात आमचे सुद्धा छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न आहेत. जेणे करून मतांचे विभाजन होऊ नये व त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळू नये हाच आमचा प्रमुख उद्देष आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळे वेगवेगळे लढल्यामुळे आम्हाला नुकसान झाले होते. हे टाळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पण, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही. चर्चेला तयार आहोत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणार हे आपल्याला फक्त माहीत नव्हते तर खात्री होती. युतीमुळे आमचे फारसे काही बिघडणार नाही, पण सगळ्यात मोठे प्रश्‍नचिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत निर्माण होतात. चार वर्षे ज्यांच्या विरोधात सतत बडबड केली त्यांच्याशी संगत करण्याची पाळी ठाकरे यांच्यावर का आली? हे कोडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा शंभर ते सव्वाशेने कमी होतील. हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळेच ते आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये लक्ष देऊन तेथे युती करत आहेत.

जनतेची दिशाभूल करू नये…
पाकिस्तानचा बाजार किंवा पाणी बंद करून काहीही होणार नाही. गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी बंद करू ही केलेली घोषणा सुद्धा हास्यापद आहे. आपण अशा प्रकारे पाणी बंद करूच शकत नाही. कारण, हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. अशा प्रश्‍नांवर तडकाफडकी निर्णय घेता येत नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. पुलवामा हल्यानंतर कॉंग्रेस पूर्णपणे पंतप्रधानांच्या पाठिंशी उभे आहे. त्यामुळे आता त्यांनी कृती करावी. सैन्याला पूर्ण अधिकार दिले म्हणजे सगळे झाले असे होत नाही. अधिकार हे पंतप्रधान आणि केंद्रिय समितीलाच असतात. त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नये. छोट्या-मोठ्या कारवाया करून कोंडी होत नसते. हल्ला आणि कारवाई यामध्ये फरक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)