जुना बाजार चौकातील घटनेने उडवला थरकाप

– पुण्यातील घटना : सात जण गंभीर जखमी


– ऑटो रिक्षा, कार, दोन दुचाकींचा चुराडा


– घटनास्थळी जखमींचे विव्हळणे आणि रक्ताचे पाट


– महापालिकेच्या सूचनांकडे रेल्वेचे दुर्लक्ष भोवले


– होर्डिंग पाडणे सुरू असतानाच कोसळला

पुणे – रेल्वे हद्दीत उभारलेले अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा सांगाडा कापत असताना तो सिग्नलवर थांबलेल्या 6 ऑटोरिक्षा, कार आणि 2 दुचाकींवर कोसळून 2 ठार, 7 जण गंभीर जखमी व दोघे किरकोळ जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जुन्या बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात घडली. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवित जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. होर्डिंगबाबत महापालिकेने रेल्वे प्रशासनाला सन 2013 पासून पत्राद्वारे वेळोवळी सांगितले. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तर, हे होर्डिंग पाडण्याचे काम रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी दुपारीच हाती घेतले होते. त्याचवेळी ते कोसळले.

भगवान धोत्रे (48) व भीमराव कसार (70) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. तर, शिवाजी देविदास परदेशी (40), जावेद मिसबाउद्देन खान (49), उमेश धर्मराज मोरे (36), किरण ठोसर (45), यशवंत खोबरे (45), महेश वसंतराव विश्‍वेश्‍वर (50), रुक्‍मिनी परदेशी (55) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. देवांश परदेशी (40) आणी समृद्धी परदेशी (18) यांना उपचार करुन सोडण्यात आले.

शाहीर अमर शेख चौकात 40 बाय 40 फुट अशा उंचीची दोन अनधिकृत होर्डिंग्ज रेल्वेच्या हद्दीत आहेत. यातील एक धोकादायक होर्डिंग पाडण्याचे काम रेल्वेने ठेकदाराला दिले. याची कोणतीही माहिती महापालिका तसेच वाहतूक विभागाला देण्यात आली नाही. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काम सुरू करण्यात आले होते. यावेळी होर्डिंग दोरीने मागच्या बाजूला दगड व लोखंडी वजनाला बांधण्यात आले होते. तर दुसरीकडे गॅस कटरच्या सहाय्याने होर्डिंग थेट खालूनच कापण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी वाहतूक सुरुच होती.

दरम्यान, 2 वाजून दहा मिनिटांनी चौकातील सिग्नल सुटल्यावर वाहने निघून गेली. मागून आलेली वाहने पुढे येताच सिग्नल लागला. यावेळी सहा रिक्षा, एका स्विफ्ट डिझायर कार, अॅक्‍टिव्हा व एक बाईक तेथे थांबली. यावेळी अचानक 40 बाय 40 फुटांचा फ्लेक्‍स त्यांच्यावर कोसळला. यामध्ये रिक्षाचे हुड फाडून फ्लेक्‍सच्या लोखंडी पट्ट्या रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या डोक्‍यावर आदळल्या, तर अॅक्‍टिव्हावरील व्यक्तीच्या डोक्‍यावर होर्डिंगचा मोठा भाग पडल्याने त्यांच्या डोक्‍याची शकले झाली होती. जखमींचे विव्हळणे आणि रक्ताचे पाट पाहून घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

सर्वप्रथम नागरिकांनी रिक्षात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यातील एका महिलेचा पाय शरीरापासून निखळला गेला. तर एक रिक्षाचालक डोक्‍याला गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्धावस्थेत पडला. जखमींना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तोवर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले. हा रस्ता रहदारीचा असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

…अशी घडली घटना
आरटीओकडे जाणाऱ्या मार्गावरील शाहीर अमर शेख चौकात दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे प्रशासनाने हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. ते कापून काढत असताना हा अपघात झाला. होर्डिंग कोसळले तेव्हा नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती आणि तेथील सिग्नलवर सहा रिक्षा, दोन दुचाकी व एका कार उभी होती. अचानक आदळलेल्या वजनदार होर्डिंग पडल्याने रिक्षा व कारचा चुराडा झाला. आतील चालक व प्रवाशांना जबर मार लागला.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रु.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, गंभीर जखमी व्यक्तींना एक लाख रुपये व अन्य जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रेल्वेचे बोट जाहिरात एजन्सीकडे
रेल्वेच्या जागेतील काही जाहिरात होर्डिंगबाबत “स्ट्रक्‍चरल ऑडिट रिपोर्ट’ मागण्यात आला होता. मात्र, संबंधित एजन्सीने अनेकदा मागणी करूनही रिपोर्ट सादर केला नाही. तसेच, त्या होर्डिंगचे स्ट्रक्‍चर मजबूत नसल्याचे आढळून आल्याने ते काढण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता, असा दावा मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने केला आहे. तसेच, ते काम दुसऱ्या एजन्सीकडून करण्यात येत होते, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले. ही दुर्घटना होर्डिंग काढणाऱ्या एजन्सीच्या दुर्लक्षामुळे घडली असल्याचा आरोप रेल्वे प्रशासनाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
94 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
70 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)