अल्झायमर (स्मृतिभ्रंश) भाग-1

-डाॅ. चंद्रशेखर मेश्रम

दरवर्षी नोव्हेंबर हा महिना अल्झायमर प्रतिबंधक जनजागृती महिना म्हणून जगभर साजरा केला जातो. अल्झायमर साधारणपणे 60 वर्षे वयानंतर दिसून येतो. मनावर जास्त ताण आला, तर कमी वयातही आठवण राहात नाही. कारण मन इकडे तिकडे भटकत असतं, हा ही डिमेन्शियाचा प्रकार नाही. डिमेन्शियावर सध्या औषध नाही.

स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाच्या अनेक प्रकारांपैकी अल्झायमर हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. एलाइस अल्झायमर नावाच्या जर्मन मानसिक रोगतज्ज्ञाने 1901 मध्ये अगस्टी डीटर नावाच्या 50 वर्षांच्या स्त्रीमध्ये स्मृतिभ्रंशाची लक्षणे बघितली आणि तिच्या मृत्यूनंतर 1906 मध्ये त्यावर लेख प्रकाशित केला, तेव्हापासून या आजाराला अल्झायमर म्हणतात.

लक्षणे…

-विसरभोळेपणा
-घराचा पत्ता विसरणे
-नातेवाइकांची नावे विसरणे
-नवीन गोष्टी शिकण्यात अडचण
-कपडे व्यवस्थित न घालणे
-योग्य शब्द न आठवणे
-रोजच्या कामात अडचण

न आठवणे, विसरणे, घराचा रस्ता विसरणे, नवीन गोष्टी शिकण्यात अडचण येणे, एकच प्रश्न पुन्हा विचारणे, नेहमी भेटणाऱ्या लोकांना न ओळखणे, कपडे बरोबर न घालणे, व्यक्तिमत्त्व बदलणे अशी अनेक लक्षणे या रुग्णांमध्ये दिसतात. एक स्त्री 65 वर्षांच्या आपल्या पतीला त्यांच्या वागणुकीतील बदलांमुळे तपासायला घेऊन आली.

ती म्हणाली, यांनी उभ्या आयुष्यात परस्त्रीकडे बघितले नाही. परंतु आजकाल कुठेही गेले तर बायांच्याच मागे लागतात. एक रुग्ण तपासायला आले आणि मलाच म्हणाले, या-या, बसा-बसा. कधी आलात? एका गृहस्थाने तर पायजाम्याऐवजी चक्क पेटीकोट घातला होता! अशी अनेक लक्षणे डिमेन्शियाग्रस्तांमध्ये दिसतात.

कारणे…

-मेंदूच्या पेशींची क्रयशक्ती कमी होणे
-मेंदू आकुंचन पावणे
-मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांत अवरोध

अल्झायमरमध्ये मेंदूच्या पेशींचे प्रमाण कमी होऊन मेंदू आकुंचन पावतो. डिमेन्शियाच्या अन्य एका प्रकारात, मेंदूच्या लहान रक्तवाहिन्या बंद होतात, याला व्हॅसक्‍युलर डिमेन्शिया म्हणतात. हा प्रकार अल्झायमरपेक्षा जास्त दिसतो. अल्झायमर साधारणपणे 60 वर्षे वयानंतर दिसून येतो. 65 वर्षे वयानंतर तीनपैकी एकाला पक्षाघात किंवा डिमेन्शिया होणार, इतकं या आजाराचं स्वरूप मोठं आहे. वाढत्या वयानुसार थोडीफार आठवण कमी होत जाते, पण तो डिमेन्शियाचा प्रकार नाही. मनावर जास्त ताण आला, तर कमी वयातही आठवण राहात नाही. कारण, मन इकडे तिकडे भटकत असतं, हाही डिमेन्शियाचा प्रकार नाही. डिमेन्शियावर सध्या औषध नाही. परंतु औषधाने काही लक्षणे निश्चितच कमी होतात. यासाठी तज्ज्ञडॉक्‍टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

डिमेन्शिया रुग्णाला सांभाळायची घरच्या लोकांची मोठी जबाबदारी असते. ते काय आहे? (व्हॉट इज दॅट) ही एक शॉर्टफिल्म आहे. यात डिमेन्शियाग्रस्त म्हातारा आणि त्याचा तरुण मुलगा अंगणात बसले असतात. वडील मुलाला विचारतात, ते काय आहे? मुलगा सांगतो, ती चिमणी आहे वडील पुन्हा विचारतात, ते काय आहे. मुलगा म्हणतो, मी आताच तुम्हाला सांगितलं, ती चिमणी आहे, तरी पुन्हा विचारता? चिमणी उडून दुसरीकडे बसते.

वडील पुन्हा विचारतात, तेव्हा मुलगा रागावून म्हणतो, आता गप्प बसा. वडील मग घरातून एक डायरी घेऊन येतात, त्यात लिहिलेलं मुलाला वाचायला सांगतात. त्यात नोंद असते की, त्याच अंगणात तो तीन वर्षांचा असताना त्याने लागोपाठ एकवीस वेळा आपल्या वडिलांना ते काय आहे, असे विचारले होते आणि प्रत्येकदा त्याच्या वडिलांनी तेवढ्याच प्रेमाने त्याला सांगितले होते की, ती चिमणी आहे. हे तो वाचतो अन्‌ वडिलांची क्षमा मागत त्यांना मिठी मारतो. डिमेन्शियाच्या रुग्णाला लहान मुलांसारखे सांभाळावे लागते. कारण आपण विसरतो, काही चुकीचे करतो, हे रुग्णाला समजत नाही.

बाहेर जाताना रुग्णासोबत कुणीतरी असावे लागते. त्याच्या खिशात एक कार्ड नेहमी ठेवावे. ज्यावर त्याचे नाव, पत्ता, फोननंबर असावा. डिमेन्शिया होऊ नये, यासाठी नियमित शारीरिक व बौद्धिक व्यायाम करा. पोषक आहार घ्या, सिगारेट, दारूपासून दूर राहा. मधुमेह, रक्तदाबाचे नियमित औषध द्या. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, नवीन छंद जोपासा आणि समाजकार्यात रस घ्या.

अल्झायमर (स्मृतिभ्रंश ) भाग2


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)