महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू तरी शहर बससेवा अद्यापही कागदावर

सत्ताधाऱ्यासह विरोधकांना नाही देणे घेणे ; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू 

नगर: महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी शहर बससेवा अद्यापही कागदावर आहे. अर्थात आचारसंहिता लागू झाल्याने ही सेवा आता सुरू होण्याची शक्‍यता धुसर झाली आहे. आता नवा महापौर झाल्यानंतर ही बस सुरू होण्याची शक्‍यता आहे. ही बस गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद पडली आहे. परंतू त्याचे ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना देणे-घेणे. या दोघांनी ही सेवा तातडीने सुरू करण्याबाबत प्रयत्न केले नाही. परिणामी आहे. रिक्षा चालकांचे फावले असून प्रवाशांची सर्रास लुट सुरू आहे. त्याला महापालिकेतील सत्ताधार शिवसेनेसह विरोधी राष्ट्रवादीच कारणीभूत आहे.

टक्‍केवारीच्या नादात आपण नगरकरांना सेवा देण्याचा विसर या मंडळींना पडला आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कार्यारंभाचे आदेश देखील दिले आहे. परंतू अद्यापही सेवा काही सुरू झाली नाही. कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर 60 दिवसांत ही शहर बस सेवा सुरू होणे आवश्‍यक आहे. पण आता ही सेवा सुरू होण्यास विलंब लागणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे 45 दिवस तरी सेवा लांबणीवर पडली आहे.

नगरकरांना शहर बससेवा (एएमटी) आवश्‍यक असून उपनगरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा जीवनवाहिनी आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा बहुतेक खासगी बेकायदेशीर ऍपे रिक्षाचालकांच्या हातात गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. नागरिकांना बससेवेच्या तुलनेत जास्तीचे दर द्यावे लागतात. पूर्वीची शहर बससेवा मोडकळीस आल्याने कोणत्याही ठिकाणी बस बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होत होता. त्याबरोबरच बसची अवस्था बिकट झाल्याने प्रवासी जखमी होण्याचीही शक्‍यता होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला बससेवा दुरुस्त करण्याच्या वारंवार सूचना दिल्या, पण ही सेवा दुरुस्त झाली नाही. दुसरीकडे तत्कालीन यशवंत ऑटो या ठेकेदाराने 16 महिन्यांची थकीत असलेली सुमारे 80 लाखांची थकबाकी द्यावी, अशी मागणी पुढे केली. नंतर ही सेवा बंद पडल्याने 17 एप्रिलला नव्याने निविदा मागवण्यात आल्या. त्यानुसार दीपाली ट्रान्स्पोर्टला नवीन बसगाड्या देण्याची अट घालत स्थायी समितीने सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या सभेत मंजुरी दिली.

दरम्यान, यशवंत ऑटो एजन्सीच्या धनंजय गाडे यांनी नव्याने बससेवा सुरू करण्यास आक्षेप घेतला. मनपाने थकीत 80 लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नव्याने बससेवा सुरू करण्यास त्यांनी स्थगिती मागितली. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही सेवा सुरू करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान होते. त्यानुसार 25 दिवसांपूर्वीच बससेवा सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा सुरू करण्यासाठी 60 दिवसांची मुदत आहे. परंतु ही सेवा बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिलांची मोठी गैरसोय होत आहे. चढ्या दराने अव्वाच्या सव्वा दरात शहरात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. ही सेवा अनेक दिवसांपासून बंद राहिल्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी मुद्दा मिळाला आहे. सत्ताधारी ही सेवा तातडीने सुरू करून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

सध्या तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर याचे खापर फोडत आहे. गाडे यांनी न्यायालयात धाव घेतली. अर्थात गाडे हे राष्ट्रवादीचे आहे. तर नव्याने ठेका घेणारे गाडे हे शिवसेनेचे आहे. त्यातून राजकारण म्हणून या सेवाचा खेळ करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. त्याचा फटका नगरकरांना बसत आहे. परंतू त्याचे कोणालाही देणेघेणे नाही. आज रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असून रात्री आठ नंतर तर अक्षरशः प्रवाशांची लूट सुरू असते. त्याबद्दल अनेक नागरिकांनी तक्रारी केला. पण कोण न्याय देणार असा प्रश्‍न आहे.

पोलीस याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. अन्‌ महापालिका बससेवा सुरू करीत नाही. अशा स्थितीत नगरकरांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यातील राजकारणापाई आर्थिक झळ नगरकरांना सहन करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)