मुलाखतीशिवाय भरतीचा “रयत’ने स्वीकारला पर्याय

आचारसंहितेनंतर होणार 1037 उमेदवारांच्या नियुक्‍त्या
गुरूनाथ जाधव

सातारा – रयत शिक्षण संस्थेने मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीचा पर्याय स्वीकारून पुरोगामी पाऊल उचलले असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
सर्व संस्थाना विदाऊट इंटरव्ह्यू हा विकल्प निवडण्याचे आवाहन सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले होते. त्यास रयत शिक्षण संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

एकीकडे शिक्षक भरती पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा काही खासगी संस्थांचा आटापिटा सुरू असताना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आधारे पवित्र मधून मुलाखती शिवाय शिक्षक भरती करण्याचे पुरोगामी व धाडसी पाऊल उचलले आहे. याबद्दल शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी देखील रयतचे अभिनंदन केले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले रयत शिक्षण संस्थेचा विस्तार राज्यातील 15 जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एकूण 1037 जागांवर मुलाखती शिवाय पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची नियुक्ती आचारसंहितेनंतर होणार आहे.

राज्यात सुमारे नऊ वर्षानंतर 12 हजार शिक्षकांची भरती पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक पध्दतीने यावर्षी पासुन होत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना पवित्र मधून थेट उमेदवार मिळणार आहेत. पवित्रला विरोध करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर 7 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखतीसाठी पवित्र प्रणालीतून देण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष नेमणुका किंवा मुलाखती होणार आहेत. शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या हेतूने पूर्वतयारी म्हणून नोंदणीकृत व पात्र उमेदवारांना त्यांच्या इच्छेनुसार संस्थांचे पसंतीक्रम देण्याची ऑनलाईन सुविधा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मिळण्याची शक्‍यता आहे.

पवित्र प्रणाली खाजगी संस्थांना उमेदवार निवडीसाठी इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू विकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील विकल्प स्वीकारणे हे संस्थांसाठी बंधनकारक नसून काही विकल्प ऑनलाईन भरण्यासाठी संस्थांना 25 मार्चपर्यंत मुदत होती ती मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. सातारा माध्यमिक ने खाजगी शिक्षण संस्थांमधील 1220 पदांच्या जाहिरातीस पवित्र परवानगी दिली होती.

रयतच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील व राज्यातील अन्य खाजगी संस्था विदाऊट इंटरव्यूचा पर्याय स्वीकारतात का याकडेही पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण सुमारे बारा हजार जागा पवित्र मधून भरल्या जाणार आहेत ज्या खाजगी संस्था 1:10 (मुलाखतीतुन उमेदवार निवड ) हा पर्याय स्वीकार करतील त्यांना मुलाखतीचे रेकॉर्ड व्यवस्थित व अद्यावत ठेवावे लागणार आहे. शिवाय त्या दहांमधील टॉपला डावलून अन्य उमेदवारांची गुणवत्तेनुसार पहिला उमेदवार सोडून अन्य उमेदवारांपैकी निवड केल्यास कारणे द्यावी लागणार आहेत. याबाबत सविस्तर सूचना संस्था व उमेदवारांना पवित्र पोर्टल द्वारे देण्यात येणार आहेत.

राज्यात 12001 पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये उमेदवारांसाठी जिल्हा व विभाग स्तरावर मदत कक्ष उभारले आहे. एप्रिलमध्ये संस्था निवडीचे विकल्प उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहेत. पवित्र प्रणालीवर उमेदवार व संस्था चालकांसाठी सविस्तर सूचना देण्यात येणार आहेत. इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू यातील कोणताच पर्याय विहित मुदतीत न निवडल्यास संस्थांना 1:10 प्रमाणे उमेदवार देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)