अरूणाचलमध्ये मतदानाआधीच भाजपने उघडले खाते 

पक्षाच्या 3 उमेदवारांची विधानसभेवर बिनविरोध निवड 

इटानगर –अरूणाचल प्रदेशात मतदान होण्याआधीच भाजपने खाते उघडले आहे. त्या पक्षाच्या 3 उमेदवारांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी 11 एप्रिलला मतदान होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांशिवाय कुणीच रिंगणात राहिले नाही. त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांना बिनविरोध विजयी म्हणून जाहीर करण्यात आले. भाजप सत्तेवर असलेल्या अरूणाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. आता 3 उमेदवारांची झालेली बिनविरोध निवड भाजपच्या दृष्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सुचिन्हच ठरणार आहे.

अरूणाचलमध्ये लोकसभेच्या एकूण 2 जागा आहेत. त्या राज्यात एकूण 7 लाख 94 हजार 162 मतदार आहेत. ते विधानसभा निवडणुकीतील 191 आणि लोकसभा निवडणुकीतील 12 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. विधानसभेच्या उर्वरित 57 जागांसाठी भाजपचे तितकेच उमेदवार रिंगणात आहेत. त्याखालोखाल कॉंग्रेसचे 47 आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे 30 उमेदवार नशीब आजमावत आहेत. इतर लहान पक्षांनीही काही जागांवर उमेदवार दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)