नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे अल्पेश ठाकोर आता भाजपात सामील होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मागील महिन्यांपासून अल्पेश ठाकोर काँग्रेसची साथ सोडणार आणि भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मार्च महिन्यात अल्पेश ठाकोर यांनी यावर स्पष्टीकरण दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहून पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे म्हंटले होते. परंतु, गेल्या काही दिवसासांपासून अल्पेश ठाकोर बाहेरगावी गेले असून त्यांच्याशी संपर्क होत नाही. तसेच अल्पेश ठाकोर यांच्या जवळचे सहकारी धवल झाला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, अल्पेश ठाकोर भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.