मूळ प्रश्‍नांना बगल देत “स्टंटबाजी’

प्रसिद्धीसाठी पार्थ पवारांचा खटाटोप : मतदार संघात उलट – सुलट चर्चा 

पिंपरी – पहिल्याच भाषणात तोंडघशी पडल्यानंतर मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची “स्टंटबाजी’ सुरू आहे. मतदार संघातील मूळ प्रश्‍नांना बगल देत कधी घोड्यावर बसून तर कधी बैलगाडी, रिक्षा, तर कधी रिकाम्या लोकलमधून प्रवास करत मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघातील प्रश्‍नांवर बोलण्याऐवजी पार्थ यांची सुरू असलेली स्टंटबाजी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत होत आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्यात लढत होणार आहे.

अजित पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू यामुळे मावळ मतदार संघ भलताच चर्चेत आला आहे. कधीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपाठीवर न दिसलेले अथवा संघटनात्मक पातळीवर काम न केलेले पार्थ पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह मतदारांच्याही भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीच्या इच्छुकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. मात्र नाराजीचा घोट गिळून पार्थ यांच्यामागे राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांची धावाधाव सुरू आहे.

घराणेशाहीच्या आरोपामुळे पहिल्या दिवसापासून चर्चेत आलेल्या पार्थ पवार यांची पहिल्याच भाषणात भंबेरी उडाली. त्यामुळे पार्थ यांनी आता प्रवासी साधनांमधून प्रचाराचा फंडा आजमावला आहे. कधी घोडेस्वारी करत तर कधी नृत्यावर ठेका धरत एवढेच नव्हे तर रिक्षा, रिकामी लोकल, बैलगाडी यातून प्रवास करत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. या प्रकारामुळे पार्थ यांच्या स्टंटबाजीचीच चर्चा सुरू झाली आहे. मावळ मतदारसंघाचा विस्तार दोन पातळ्यावंर आहे. घाटाखालच्या आणि घाटावरच्या मतदारांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. या प्रश्‍नांवर त्यांनी आतापर्यंत एकदाही चर्चा केलेली नाही. केवळ टीका टिपण्णी आणि स्टंटबाजी यावरच त्यांचा भर दिसून येत आहे.

बिनकामी कार्यकर्त्यांचा गोतावळा, गाड्यांचे ताफे, मतदारसंघाबाहेरील नेत्यांची बाहुगर्दी या बाबीदेखील चर्चेचा विषय बनल्या आहेत. पार्थ यांच्यासाठी पवार घराणे झटत असतानाच दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या अपरिपक्व प्रचारामुळे पार्थ यांचे हसे होवू लागले आहे. अनियोजित प्रचार यंत्रणा, दिशाहिन कार्यकर्ते आणि योग्य भूमिकेचा अभाव या बाबी पार्थ यांना अडचणीच्या ठरण्याची शक्‍यता आहे.

पनवेलच्या व्हिडीओवरुन “ट्रोल’

पार्थ पवार यांचा धावतानाचा व्हिडीओ पनवेलमध्ये वाऱ्यासारखा पसरला आहे. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पळत सभेसाठी जात असल्याचा व्हिडीओ पसरविण्यात आला आहे. मात्र, येथे पार्थ यांची कोणतीही सभा नव्हती एवढेच नव्हे तर वाहतूक कोंडी देखील झाली नव्हती. केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा “स्टंट’ होता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पार्थ सोशल मीडियावर “ट्रोल’ झाले आहेत. पार्थ पवार यांचे आणखी कोणकोणते “स्टंट’ पहायला मिळणार याबाबत मावळ मतदार संघात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

बारणे – जगताप मनोमिलन नावापुरतेच ?

निवडणुकीसाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मनधरणीसाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने ही भेट झाली. त्यानंतर बारणे-जगताप मनोमिलनाची चर्चा शहरात पसरली होती. परंतु, या भेटी दरम्यान, आमदार जगताप यांनी बारणेंच्या समोरच नाराजीचा सूर आळवल्याचे समजते. अवघ्या तीन मिनिटांची ही भेट होती. घरी येण्याऐवजी पक्ष कार्यालयात चार कार्यकर्त्यांमध्ये भेट झाली असती तर बरे झाले असते अशा शब्दात जगतापांनी बारणेंना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)