नवी दिल्ली – कार्ती चिदंबरम यांना या महिन्यात अमेरिका, स्पेन आणि जर्मनीच्या दौऱ्यावर जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. विदेशात जाण्यापुर्वी या आधी कार्ती यांना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्याच्या अधिन राहुन त्यांना ही अनुमती दिली जात असल्याचे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कोर्टाने आज हा निर्णय देताना स्पष्ट केले. गेल्या जानेवारी महिन्यातही त्यांना विदेशात जाण्यास अनुमती दिली होती त्यासाठी त्यांना कोर्टात दहा कोटी रूपयांची अनामत जमा करण्यास सांगण्यात आले होते. आपण विदेशातून परत येऊ आणि तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करू अशी लेखी हमीही त्यांच्याकडून घेण्यात यावी अशी सुचना न्यायालयाने त्यांना केली आहे. त्यांच्यावर सीबीआय आणि ईडीने अनेक खटले दाखल केले आहेत.