बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना दोन सत्रांपर्यंत कायम राहण्यास परवानगी 

न्या. लोढा शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दोन सत्रांपर्यंत आपल्या पदावर कायम राहण्यास परवानगी देण्यचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य खंडपीठाने आज जाहीर केला. त्यामुळे बीसीसीआयचे विद्यमान हंगामी सचिव अमिताभ चौधरी आणि हंगामी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचा आणखी एका सत्रासाठी निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अर्थात सलग दोन सत्रांसाठी पदावर राहिल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना सक्‍तीने तीन वर्षांसाठीसाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे. न्या. लोढा समितीच्या शिफारशींनुसार पदाधिकाऱ्यांना केवळ एका सत्रासाठी पदावर राहिल्यानंतर विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे राज्य संघटनांमध्ये नाराजी होती. परंतु नव्या निर्णायानुसार विद्यमान पदाधिकाऱ्यांना सहा वर्षे पदावर राहता येणार आहे. मात्र नव्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सक्‍त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय आणि राज्य संघटनांना दिला असून तसे न केल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.
बीसीसीआयच्या प्रसासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रशंसा केली असून हा आदेश सर्व संभ्रम दूर करणारा आणि सदस्य संघटनांसमोरील पेच सोडविणारा असल्याचे म्हटले आहे. माझे मतही दोन सत्रांसाठी पदाधिकाऱ्यांना आपल्या पदावर काय राहता यावे असेच होते. परंतु त्यावर एकमत होत नव्हते, असे सांगून राय म्हणाले की, नव्या आदेशांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठीच आमची नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्य न्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. खानविलकर व न्या. चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रेल्वे, सेनादल व विद्यापीठ या ंसगांचे कायम सदस्यत्व पुनर्स्थापित केले. तसेच मुंबई, सौराष्ट्र, बडोदा व विदर्भ यांना सदस्यत्व दिल्याचे जाहीर केले. खंडपीठाच्या निर्णयाचे प्रशासकीय समितीच्या आणखी एक सदस्या डायना एडलजी यांनीही स्वागत केले. तसेच मुंबई, सौराष्ट्र, बडोदा व विदर्भ यांचे सदस्यत्व कायम राहिल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्‍त केले. मुंबईसारख्या ऐतिहासिक संघटनेचे सदस्यत्व आणि मताधिकार कायम राहावा अशीच आमची इच्छा होती. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी आमचे काही वैयक्‍तिक वैर नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विशिष्ट कामासाठी नेमणूक केली आहे आणि ते काम बिनचूक होते की नाही याची आम्ही खात्री करणार आहोत, असे डायना एडलजी यांनी यावेळी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)