युती करण्यासाठी अरविंद केजरीवालांचे राहुल गांधींकडे पुन्हा एकदा साकडे

नवी दिल्ली – सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाचा सामना करायला हवा अशी भावना सर्वच मुख्य राष्ट्रीय विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये बळावताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवार, चंद्रबाबू नायडू तसेच ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही काळामध्ये शर्थीचे प्रयत्न केल्याचे देखील दिसून येते. प्रथम राष्ट्रीय पातळीवर महाआघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसला मात्र राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांमधील विजयामुळे अशा प्रकारच्या आघाडीमध्ये रस राहिला नसल्याचे चित्र आहे.

याआधीच काँग्रेसवर घमंड चढल्याचा आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना हरियाणा लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासाठी साकडे घातले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी राहुल गांधींना जाहीरपणे आघाडीसाठी आवाहन केले असून आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “देशातील जनतेला अमित शहा आणि नरेंद्र मोदी या जोडगोळीला घरचा रस्ता दाखवायचा आहे. जर हरियाणामध्ये जननायक जनता पार्टी, आम आदमी पार्टी, आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यास हरियाणातील सर्वच जागांवर भाजपचा पराभव होईल.” अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या आवाहनाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)