#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे! (भाग १)

अमित डोंगरे 
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक परदेश दौऱ्यातील कसोटी मालिका ही अपयशानेच सुरू होते. ही परंपरा इंग्लंड दौऱ्यातही कायम राहिली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित मालिकेचा निकाल काय असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. कर्णधार विराट कोहली वगळता कोणाच्याच धावा होत नाहीत आणि नेहमीप्रमाणे कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे, अशी परिस्थिती निर्माण होते. 
1980 च्या दशकात सुनील गावसकरांवर हे ओझे होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे ओझे समर्थपणे सांभाळले आता हेच काम विराट कोहली करत आहे. गावसकरांच्या काळात दिलीप वेंगसरकर, दिलीप सरदेसाई, गुंड्डापा विश्‍वनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या जोडीला कपिल देव देखील मोक्‍याच्या वेळी धावा करायचे त्यामुळे गावरकरांवरची जबाबदारी थोडी हलकी होत होती. सचिनच्या वेळीसुद्धा सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि मुख्यत्वे राहुल द्रविड सचिनचा भार हलका करायचे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात या तोडीचा एकही फलंदाज नाही. त्यामुळे धावा करून कोहलीने गोमटी फळे यशाची आणायची आणि बाकीच्यांनी फुकट ते पौष्टिक या सदराखाली ही फळे चाखायची हेच आजपर्यंत दिसत आले आहे.
एकट्या कोहलीने काय काय करायचे? नेतृत्व सांभाळयाचे, फलंदाजी करताना धावाही करायच्या, संघ निवड करताना निवड समितीने कितीही कमकुवत संघ दिला तरी चकार शब्द काढायचा नाही आणि पराभवाची नैतिक जबाबदारी देखील स्वीकारायची. पहिल्या कसोटीत मुरली विजय आणि शिखर धवन यांना आपला ऑफ स्टंप कुठे आहे हेच कळत नव्हते. धवनकडून आक्रमक सुरुवात होईल अशी अपेक्षा दोन्ही डावात वाया गेली. विजय देखील इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर हतबल झाला. के. एल. राहुल यानेदेखील दोन्ही डावात निराशाच केली. मुळात चेतेश्‍वर पुजारा याला वगळून राहुलला संघात स्थानच का देण्यात आले हा मोठा प्रश्‍न आहे. पुजाराला कौंटी क्रिकेट खेळल्यामुळे इंग्लंडमधील लहरी हवामानाचा चांगलाच अनुभव आहे तो जर कोहलीबरोबर खेळपट्टीवर उभा राहिला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता.
हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक या दोन्ही फलंदाजांना ही कसोटी एक सुवर्णसंधी होती मात्र बचाव आणि तंत्रच इतकं सामान्य आहे, की कोहलीला साथ देण्यासाठी यातील एकाही फलंदाजाचा उपयोग झाला नाही. पहिल्या डावात कोहलीने 149 धावांची अजरामर खेळी केली आणि इंग्लंडमध्ये अपयशी ठरतो हा स्वतःवरचा डाग पुसून काढला. दुसऱ्या डावातही त्यानेच अर्धशतकी खेळी करत सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र, समोरून एकाही फलंदाजाने जबाबदारी ओळखून कोहलीला साथ दिली नाही आणि हा सामना भारताला केवळ 31 धावांनी गमवावा लागला. आता उर्वरित 4 सामन्यांत कोहलीच एकांडा शिलेदार ठरणार, का अन्य फलंदाज आपली जबाबदारी ओळखून खेळ करणार हे कळेलच.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)