#क्रीडांगण: कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे! (भाग ३)

अमित डोंगरे 
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक परदेश दौऱ्यातील कसोटी मालिका ही अपयशानेच सुरू होते. ही परंपरा इंग्लंड दौऱ्यातही कायम राहिली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने उर्वरित मालिकेचा निकाल काय असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. कर्णधार विराट कोहली वगळता कोणाच्याच धावा होत नाहीत आणि नेहमीप्रमाणे कोहलीच्या खांद्यावर संघाचे ओझे, अशी परिस्थिती निर्माण होते. 
आता दुसऱ्या कसोटीसाठी संघात काही बदल केले जातील आणि फिरून तेच चित्र पाहायला मिळेल. मुळात एखाद्या दौऱ्यात भारतीय गोलंदाज सातत्याने अपयशी ठरतात हा इतिहास आहे. मात्र, हा दौरा पहिल्याच सामन्यापासून अपवाद ठरला भारतीय गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा योग्य राखत आणि स्विंगवर कमालीचा ताबा ठेवत इंग्लंडच्या भरवशाच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले, ते देखील दोन्ही डावात. फलंदाजांनी मात्र थोडीदेखील जिगर दाखवली नाही आणि जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि कंपनीसमोर कोहली वगळता सगळ्यांनी नांगी टाकली.
या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. त्यामुळे खेळपट्टी पूर्ण कोरडी पडली होती. मात्र लहरी हवामानामुळे सामन्याच्या दोन दिवस आधी ही लाट ओसरली.
नेहमीप्रमाणे काळे ढग जमा व्हायला लागले आणि खेळपट्टीने रंग बदलला. ही खेळपट्टी आता वेगवान गोलंदाजांना मदत करणार हे उघड होते त्यामुळे भारताने देखील हार्दिक पांड्या धरून चार वेगवान गोलंदाज खेळवले. एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना संभ्रमात टाकणारा कुलदीप यादव या सामन्यात खेळायला हवा होता. त्याची गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांना समजतच नव्हती त्यामुळे उमेश यादव आणि महंमद शमी यांच्यापैकी एकाला वगळून कुलदीपला खेळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. अर्थात त्याही परिस्थितीत फलंदाजांपैकी कोणीतरी जबाबदारी ओळखून कोहलीला साथ दिली असती तरी सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता. पण इतिहासात आणि क्रिकेटमध्ये जर-तरला काही अर्थ नसतो हे पुन्हा एकदा या सामन्याने सिद्ध केले.
भारताची फलंदाजी आशिया खंडातच बहरते आणि परदेशात नांगी टाकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले. एकाच सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही यशस्वी ठरले आहेत आणि भारताने एकहाती सामना जिंकला आहे असे चित्र परदेशात कधीच पाहायला मिळत नाही ही एक शोकांतिकाच आहे. असो. एकाच सामन्यातील पराभवानंतर इतके पोस्टमार्टम खूप झाले. या पराभवातून काही तरी बोध घेत उर्वरित सामन्यात भारतीय खेळाडूंनी सरस खेळ करावा आणि इंग्लंडमध्ये इंग्लंड संघालाच पराभूत करण्याची व मालिका जिंकण्याची किमया साध्य करावी, अशीच तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)