‘ऑल द बेस्ट’; बारावीची परीक्षा आजपासून

संग्रहित छायाचित्र

2 हजार 957 केंद्रांवर परीक्षा होणार


यंदा 236 ट्रांसजेंडर विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून राज्यातील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेला एकूण 14 लाख 91 हजार विद्यार्थी बसणार असून यासाठी 2 हजार 957 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.

राज्य मंडळाच्या वतीने 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्याबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना शाळांमार्फत ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली असून यावर मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये सूचना नमूद करण्यात आलेल्या आहेत. परीक्षेच्या तयारीबाबतची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या परीक्षेसाठी एकूण 9 हजार 771 कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यात 8 लाख 42 हजार 919 मुले व 6 लाख 48 हजार 151 मुलींचा समावेश आहे. 236 ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसले होते. यंदा त्यात 6 हजार 174 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यासाठी 2 हजार 822 परीक्षा केंद्रे होती. यंदा त्यात 135 ने वाढ झाली असल्याने केंद्रांची संख्या 2 हजार 957 वर पोहचली आहे. विभागांचा विचार करता मुंबई विभागात सर्वाधिक तर कोकण विभागात सर्वांत कमी विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

विज्ञान शाखेसाठी 5 लाख 69 हजार 476, कला शाखेसाठी 4 लाख 82 हजार 372, वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 81 हजार 446, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 58 हजार 12 याप्रमाणे शाखानिहाय विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. विज्ञान शाखेतील सर्वाधिक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून यासाठी एकूण 1 लाख 25 हजार 688 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 1 हजार 582 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सामान्यज्ञान या विषयाची परीक्षाही ऑनलाइन होत असून यासाठी 1 हजार 719 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 41 केंद्रांवर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)