आढळा खोऱ्यात पाणी टंचाईचे संकट

file pic

धरणात 596 दलघफू पाणीसाठा, ऑक्‍टोबर हिटचा तडाखा

आढळाचे 15 वे रितेपण!

आढळेच्या लाभक्षेत्रातील संगमनेर, अकोले आणि सिन्नर तालुक्‍यातील 16 गावांचे 3914 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. सन 2014 ते 2017 ही सलग चार वर्षे आढळेच्या सांडव्यावरुन पाणी झेपावले. त्यामुळे लाभक्षेत्रात चांगले शेतीउत्पन्न निघाले. आता उपलब्ध पाणीसाठ्यात रब्बीची किती आवर्तने होतील हा प्रश्न आहे. अजूनही लाभक्षेत्राला पावसाची आशा आहे. परंतू, सद्यस्थितीवरच धरण थांबल्यास सन 1979 पासून धरणाचे हे 15 वे रितेपण ठरेल.

अकोले – यंदाच्या खरिप हंगामात वरुणराजाने अकोले तालुक्‍यावर धरण पाणलोट क्षेत्र वगळता अवकृपा केली. मुळा व प्रवरा खोऱ्यात सिंचनाचे दोन थेंब फवारताना आढळा खोऱ्यात मात्र हात आखडता घेतला. परिणामी आढळा खोऱ्याला दिवाळीपूर्वीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 1060 दलघफू पाणी साठवण क्षमतेच्या आढळा धरणात अवघा 596 दलघफू पाणी साठा झालेला आहे.

-Ads-

परतीच्या पावसाची आशा सप्टेंबरसोबतच संपली.’मान्सूनपर्व’आटोक्‍यात आल्याने आता ‘आक्‍टोबर हिट’चा तडाखा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम अकोले तालुक्‍याच्या आढळा खोऱ्याबरोबरच लाभक्षेत्राला पाणीसंकटाचे चटके जाणवू लागले आहेत.

मागील वर्षी 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा आढळा मध्यमप्रकल्प जुलैच्या अखेरीसच पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षीही किमान स्वातंत्र्यदिनापूर्वीच हे धरण भरेल, या खोऱ्यात आनंदोत्सव साजरा होईल ही शेतकऱ्यांची आशा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने फोल ठरली.पूर्ण पावसाळ्यात केवळ 400 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. जुनेनवे मिळून धरणात आज 596 दलघफू पाणीसाठा झाला.

बिताकाकडून येणाऱ्या चराचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे ते पाणी धरण साठ्यात वळले नाही. शिवाय साऱ्याच नक्षत्रांनी ठेंगा दाखविल्याने आढळेच्या पाणलोट आणि लाभक्षेत्राला तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सरकारच्या नजर आणेवारीत 54-55 पैसे असा शिक्का बसला आहे. अंतीम मोजमापानंतरच दुष्काळ की अवर्षण यावर शिक्कामोर्तब होईल.

पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीपाची पेरणी मागीलवर्षीच्या तुलनेत अनेकपटींनी कमी झाली. शेतात उभा असणारा खरीप आता पाण्याअभावी वाया गेला आहे. ऐन टंचदाणे भरण्याच्या काळातच पावसाचे पाणी न मिळाल्याने खरीपाची बाजरी सुकून गेली. सोयाबीनच्या शेंगातही दाणे न भरल्याने केवळ काड्या शिल्लक राहिल्या. बाजरी म्हणावी अशी पिकणार नसल्याने धान्याच्या उत्पादनात मोठी घट होईल. असे शिवाजी कदम (समशेरपूर) यांनी वर्षभरासाठी जनावरांनाही वैरणीचा तुटवडा जाणवेल असे सांगितले.

पाऊस पाणी आटल्याने आढळेचा सारा परिसर करपून गेला आहे. जनावरांचा चाराही सुकून चालल्याने दूध उत्पादनावर त्याचा आता परिणाम झाला आहे. भविष्यात मोठा परिणाम होईल.पर्यायाने शेती उत्पन्नाची आशा संपल्याने शाश्वत समजल्या जाणाऱ्या दूधधंद्यावरही संकट येवून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एरव्हीचे मोबाईल टोमॅटो मार्केटिंग ठप्प झाले आहे.

विहीरींचे उद्‌भवही आटून गेल्याने विहीरींचा पाणीसाठा वेगाने खाली सरकत आहे. शेतातील सारी उभी पिके आता जळण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी कांद्याला चांगले बाजारभाव मिळाल्याने पावसाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, पाण्याअभावी लागवड झालेल्या क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र आता वाया जाणार आहे. गेल्यावर्षी उसाचे लागवडक्षेत्रही आढळेत वाढले होते. आता उभा उसही जळून जाईल.

खरीप हंगाम हातचा गेला आणि रब्बीची अपेक्षा लागलेले आढळेचे 3914 हेक्‍टर लाभक्षेत्र आता दुष्काळापुढे मान तुकविण्यास सज्ज झाले आहे. पावसाळ्याची सुरुवात जूनमध्ये होते. आता ऑक्‍टोबरनंतरचे नऊ महिने दुष्काळाशी कसा सामना करायचा ही विवंचना आहे. मागील वर्षी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी अपेक्षेने कर्ज काढून पिके उभी केली. भाजीपाला, डाळींब, कांदे या पिकांना बाजारभावच न मिळाल्याने वर्ष वाया गेलेच. शिवाय कर्जबाजारीपणा माथी वाढला.

शाश्वत उत्पन्नाच्या दुधातही उत्पादन खर्च फिटत नसल्याने आढळेचा आगामी कालखंड जिकीरीचा असणार आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना सर्वच राजकीय पक्ष थंड आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर रान उठवावे असे एकाही राजकीय नेत्याला वाटत नसल्याने सारे आपआपल्या ‘राजकारणात’ आणि ‘प्रगती’त मश्‍गूल असल्याने आता दुष्काळात पिचलेल्यांची आठवण थेट लोकसभा आणि विधानसभेलाच होईल असे या भागात चित्र आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)