अकोलेत भाजपलाही गटबाजीचे ग्रहण !

आमदार नरेंद्र दरांडे यांच्या बैठकीला अनेकांची दांडी

प्रा. डी. के. वैद्य /अकोले: शिवसेनेच्या दोन गटांची हुल्लडबाजी मागील महिन्यात खळबळ माजवून गेली. त्याची धूळ खाली बसते न बसते तोच शिस्तबद्ध पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजप सारख्या पक्षातही फारसे आलबेल नाही हे दोन दिवसांपूर्वी उघड झाले. आ. नरेंद्र दराडे यांच्या बैठकीस एक गट अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा होत आहे.

महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अकोले तालुक्‍यातील भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आ. नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव भांगरे,जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, वकील नेताजी आरोटे, सदानंद पोखरकर, वसंत मनकर, सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, अगस्तीचे संचालक महेश नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव शेळके, ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे, संत नामदेव आंबरे, प्रभाकर फाफाळे, संजय भुजबळ, डॉ. रवींद्र गोर्डे, नामदेव गोर्डे,बबलू धुमाळ आदी उपस्थित होते.

मात्र या बैठकीला भाजप जि. प. गट नेते जालिंदर वाकचौरे, पक्षाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, दिनेश शहा, धनंजय संत, वाल्मीक नवले, डॉ. किरण लहामटे, वाकचौरे समर्थक हे भाजपचे नेते आले नव्हते. प्रचार बैठक नियोजन शिवसेना उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्यासाठी ते शिवसेनेकडून निवडणूक लढवीत आहेत. पण शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ. मनोज मोरे व त्यांच्या समर्थकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली.

पाकीट, जाकीट ऑडिओ क्‍लिपमुळे सध्या गटनेते जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे व ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांच्यात दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे अशोकराव भांगरे विरुद्ध डॉ. किरण लहामटे अशी सरळ सरळ दोन गटांत विभागाणी झाली आहे. शिवसेनेचे दोन गट मागील महिन्यात एकमेकांना भिडले होते. आणि बात मुद्‌द्‌यांवरून गुद्यांपर्यंत पोचल्याने शिवसेनेचेही दोन गटांत विभाजन झाले आहे. मच्छिंद्र धुमाळ विरुद्ध समर्थक अपवाद वगळता सर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या सर्व घडामोडी ध्यानी घेऊन शिवसेना संपर्कप्रमुख आ. नरेंद्र दराडे यांनी भांडणे असावीत. पण मुके नसावे, असा सर्वांना टोला लगावला. ते म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा खासदार करायचे आहे. तुम्हाला वाटतं तितकी ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करावे, असे आवाहन केले.

यावेळी शिवाजीराजे धुमाळ म्हणाले, खासदार सदाशिवराव लोखंडे दुसऱ्यांदा दिल्लीत जाणार आहेत. अकोले तालुक्‍यातून सर्वाधिक मताधिक्‍य पाडून देण्याचे काम आपण करू. श्री धुमाळ म्हणाले, खासदार सदाशिव लोखंडे जायकवाडी आवर्तन व अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा म्हणून रात्रभर अगस्ती पुलावर झोपले म्हणून अकोले तालुका दुष्काळी जाहीर झाला.

खा.सदाशिव लोखंडे म्हणाले, निळवंडे कलव्यांना भरपूर मोठी तरतूद केली.पूर्वी पासपोर्ट काढायला पुण्याला जावे लागायचे. मात्र आता श्रीरामपुरात ही सोय मी उपलब्ध करून दिली. प्रास्ताविक महेशराव नवले यांनी केले.तर आभार जेष्ठ नेते माधवराव तिटमे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)