अकोल्यात किसान सभेचे “जेल भरो’

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर 25 हजार सह्यांचे निवेदन

अकोले – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात किसान सभेच्या वतीने आज दुपारी “जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय स्तरावर किसान सभेच्या वतीने दहा कोटी सह्या संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. देशभर “जेल भरो’ करून या सह्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना सादर करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रात वीस लाख सह्या संकलित करून राज्यभरातील तहसील कार्यालयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोल्यात आज झालेल्या “जेलभरो सत्याग्रहा’त नगर जिल्ह्याच्या वतीने 25 हजार चारशे सह्या अकोले तहसीलदारांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या. सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या, वनजमिनींचे नवे दावे स्वीकारा, वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, पीक पाहणीचे अर्ज स्वीकारून त्याची पोहोच द्या आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. तालुक्‍यात अनेक गरीब निराधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांच्या नोंदणीची मोहीम हाती घेऊन सर्व पात्र लाभार्थींना मानधन सुरू करा, अन्न सुरक्षेच्या यादीत नवीन लाभार्थींचा समावेश करा आदी मागण्या करणारे निवेदन या वेळी
तहसीलदारांना देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई “लॉंग मार्च’ काढण्यात आला होता. “लॉंग मार्च’ मध्ये शेतकऱ्यांच्या 2017 पर्यंतच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. “लॉंग मार्च’ला आज सहा महिने उलटूनही कर्जमाफीत अद्याप 2017 च्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. वनजमिनी नावे करण्यातही अक्षम्य दिरंगाई केली जात आहे, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या वतीने “जेल भरो’ मध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या वेळी डॉ. अजित नवले, यादवराव नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, सुरेश भोर, खंडू वाकचौरे, सारंगधर तनपुरे, लक्ष्मण पथवे, गणपत मधे, ज्ञानेश्वर काकड, मथुराबाई बर्डे, शांताराम बर्डे, दामू भांगरे, भाऊसाहेब मेंगाळ आदींची भाषणे झाली. या अगोदर अकोले शहरातून या आंदोलकांनी जोरदार घोषणा देत मोर्चा काढला होता.या सर्वांना नंतर सोडून देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)