अझलन शाह हॉकी स्पर्धा : भारताकडून कॅनडाचा धुव्वा

गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी

इपोह (मलेशिया): सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताने यजमान मलेशियावर मात केल्यानंतर भारताने बुधवारी झालेल्या सामन्यात कॅनडाचा 7-3 अशा गोल फरकाने धुव्वा उडवला. या विजयामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेशासाठी आपली दावेदारी आणखीनच प्रबळ केली आहे. यावेळी भारताकडून मनदीप सिंहने हॅटट्रीकची नोंद केली. साखळी फेरीत भारतासमोर अखेरच्या सामन्यात पोलंडचे आव्हान असणार आहे.

पहिल्याच सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल करत वरुण कुमारने भारताला आघाडी मिळवून दिली. कॅनडालाने देखील यावेळी भारतीय संघाच्या गोलपोस्टवर आक्रमण केले मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताकडे 1-0 अशी आघाडी राहिली. तर, दुसऱ्या सत्रात मनदीप सिंहने गोल करत भारताची आघाडी 2-0 ने वाढवली. यादरम्यान भारताला आपली आघाडी वाढवण्याची चांगली संधी होती, मात्र पेनल्टी कॉर्नवर आलेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय संघ चुकला. मात्र मनदीपने ही कोंडी फोडत लागोपाठ दोन गोल झळकावून भारताला मध्यांतरापर्यंत 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यावेळी कॅनडाने प्रति आक्रमणाचा केलेला प्रयत्न भारताच्या गोल किपरने हाणुन पाडत भारताची आघाडी कायम राखली.

मध्यांतरानंतर कॅनडाने आपल्या आक्रमणाची धार वाढवत, भारताला टक्कर देण्यास सुरुवात केली. पेनल्टी कॉर्नवर गोल करत कॅनडाच्या मार्क पिअर्सनने आपल्या संघाची पिछाडी 4-1 ने कमी केली. मात्र दुसरीकडून अमित रोहिदासने तिसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर आणखी एका गोलची नोंद करत भारताच्या आघाडी 5-1 ने भक्कम केली. अखेरच्या सत्रात अमित रोहिदासकडून झालेल्या चुकीचा फायदा उचलत कॅनडाच्या फिन बुथरॉयडने गोल करत आपल्या संघाचा दुसरा गोल नोंदवला. मात्र भारतीय खेळाडूंनी सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. मनदीप सिंहने दिलेल्या पासवर विवेक प्रसाद सागरने गोल करत भारताच्या गोलखात्यात आणखी एका गोलची भर घातली.
अखेरच्या काही मिनीटांमध्ये कॅनडाने पेनल्टी कॉर्नवर गोल करत आपली झुंज कायम ठेवली. जेम्स विल्यसने भारतीय बचावफळी भेदत कॅनडाची पिछाडी 6-3 ने कमी केली. मात्र यानंतर सामना संपायला दोन मिनीटे बाकी असताना निलकांत शर्माने गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

तत्पूर्वी कालच्या सामन्यात, भारताने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करताना यजमान मलेशियाचा 4-2 असा पराभव केला आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

यावेळी भारताकडून भारताकडून सुमित कुमार (17व्या मिनिटाला), सुमित कुमार ज्युनियर (27व्या मिनिटाला), वरुण कुमार (37व्या मिनिटाला) आणि मनदीप सिंग (58व्या मिनिटाला) यांनी गोल झळकावले. मलेशियाकडून राझी रहिम (21व्या मि.) आणि फिरहान अशारी (57व्या मि.) यांनी गोल केले. भारताने दोन विजय आणि एका बरोबरी राखत एकूण 7 गुणांनिशी दुसरे स्थान मिळवले आहे, तर कोरियाचा संघ (7 गुण) अव्वल स्थानावर आहे. भारताने जपानला 2-0 असे हरवले, तर कोरियाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)