बालभारतीच्या पुस्तकात नवी आकडेवारी सांगून नव्या पिढीचे वाटोळे- अजित पवार

मुंबई: मोदी सरकारच्या नावाखाली फडणवीस सरकार काहीही करू पाहत आहे. बालभारतीच्या पुस्तकात नवी आकडेवारी सांगून नव्या पिढीचे वाटोळे करत आहेत, अशी भीती विधिमंडळ नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अंकवाचनाची शिकवलेली नवीन पद्धत अजब आहे. जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत असं करणं म्हणजे यात विद्यार्थ्यांचंच नुकसान होणार आहे. सरकारनं गांभीर्यानं याकडे पाहिलं पाहिजे आणि ताबडतोब ही नवी पद्धत थांबवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे (बालभारती) यंदाच्या वर्षापासून इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल केला असून त्याची अंमलबाजवणीही सुरू करण्यात आली आहे. गणित विषयाच्या पुस्तकात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना समजण्यासाठी संख्या वाचनात बदल करण्यात आला आहे. आता एकवीसऐवजी “वीस एक’, त्र्याहत्तरऐवजी “सत्तर तीन’, ब्याण्णवऐवजी “नव्वद दोन’ असे वाचण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत.

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात 21 ते 99 या संख्याचे वाचन व शब्दांत लेखन यात बदल करण्यात आला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची व लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही पद्धती देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान या नव्या शिक्षण पद्धतीला विरोधकांनी विरोध केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)