अजय जयरामची अंतिम फेरीत धडक ; मिथुन मंजुनाथचे आव्हान संपुष्टात 

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा 
हो चि मिन्ह: दुखापतीतून पुनरागमन करणारा भारताचा गुणवान युवा खेळाडू अजय जयरामने जपानच्या यु इगाराशीचे आव्हान दोन सेटच्या लढतीनंतर मोडून काढताना व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र भारताचा युवा खेळाडू मिथुन मंजुनाथचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.
याआधीच्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगवर सरळ गेममध्ये मात करणाऱ्या बिगरमानांकित अजय जयरामने उपान्त्य फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित यु इगाराशीचा 21-14, 21-19 असा 34 मिनिटांत पराभव करीत अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याआधी पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा, दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचा पराभव करणाऱ्या अजय जयरामने तिसऱ्या फेरीत ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होवर सनसनाटी मात करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती.
तसेच अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या उपान्त्यपूर्व लढतीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचे आव्हान मोडून काढताना अजय जयरामने उपान्त्य फेरीत धडक मारली होती. पुरुष एकेरी विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात अजयसमोर इंडोनेशियाच्या जायंट किलर शेसार हिरेन हृस्टाव्हिटोचे आव्हान आहे. शेसार हिरेनने दुसऱ्या उपान्त्य लढतीत भारताच्या मिथुन मंजुनाथचे आव्हान 21-17, 19-21, 21-14 असे तीन गेमच्या कडव्या झुंजीनंतर संपुष्टात आणताना अंतिम फेरीत धडक मारली. या लढतीत शेसार हिरेनने पहिली गेम जिंकल्यावर मिथुनने आपला खेळ उंचावताना दुसरी गेम जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. परंतु शेसारने आपल्या डावपेचांत हुशारीने बदल करताना तिसरी गेम जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.
सलग तिसऱ्या आठवड्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूचा सहभाग असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन आठवड्यांपूर्वी सौरभ वर्माने रशियन ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. गेल्या आठवड्यांत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर उद्या अजय जयराम व्हिएतनाम स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपदासाठी लढणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)