ओपन बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयराम, ऋतुपर्णा उपान्त्यपूर्व फेरीत दाखल 

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा 
हो चि मिन्ह: अजय जयराम आणि ऋतुपर्णा दास या अव्वल भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये मात करताना व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष व महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र भारताचा युवा खेळाडू कार्तिक जिंदालचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. याआधी सिरिल वर्मा, रसिका राजे, मुग्धा आग्रे व वैदेही चौधरी या भारतीयांना सलामीलाच पराभव पत्करावा लागला होता.
पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा, तर दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचा पराभव करणाऱ्या अजय जयरामने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होचे आव्हान 22-20, 21-14 असे सरळ गेममध्ये मोडून काढले. कोएल्होने याआधी भारताच्या सिरिल वर्माचा पराब” केला होता. परंतु अजयसमोर त्याचे डावपेच निष्प्रभ ठरले.
अजय जयरामसमोर आता कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचे आव्हान आहे. शेंगने तिसऱ्या फेरीच्या लढतीत भारताच्या कार्तिक जिंदालचा प्रतिकार 21-10, 24-22 असा संपुष्टात आणला. पहिली गेम सहज गमावल्यावर कार्तिकने दुसऱ्या फेरीत कडवी झुंज दिली. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.
महिला एकेरीच्या आधीच्या फेरीत जपानच्या शिओरी सैतोचा पराभव करणाऱ्या भारताच्या ऋतुपर्णा दासने तिसऱ्या फेरीत तैपेई चीनच्या सहाव्या मानांकित संग शुओ युन हिच्यावर 21-8, 21-14 असा 24 मिनिटांत विजय मिळवून आगेकूच केली. ऋतुपर्णासमोर उपान्त्यपूर्व फेरीत थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानचे कडवे आव्हान आहे. चायवानने तृतीय मानांकित यिंग यिंग ली हिच्यावर 21-15, 21-11 असा एकतर्फी विजय मिळविताना आगेकूच केली.
याआधी महिला एकेरीत भारताच्या रसिका राजेला मलेशियाच्या येन मेई हो हिच्याकडून 16-21, 13-21 असा 34 मिनिटांत पराभव पत्करावा लागला असून मुग्धा आग्रेवर सातव्या मानांकित हॅन युएने 21-13, 21-12 असा विजय मिळविला. मलेशियाच्या क्रिस्टल पॅनने वैदेही चौधरीचा 21-14, 21-13 असा धुव्वा उडविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)