अजय जयराम उपान्त्य फेरीत, ऋतुपर्णाचे आव्हान संपुष्टात 

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा 

हो चि मिन्ह: भारताचा गुणवान युवा खेळाडू अजय जयरामने कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगवर सरळ गेममध्ये मात करताना व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. मात्र भारताची युवा खेळाडू ऋतुपर्णा दासचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. याआधी रसिका राजे, मुग्धा आग्रे व वैदेही चौधरी या भारतीयांना महिला एकेरीत पराभव पत्करावा लागला होता. 

पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा, दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचा पराभव करणाऱ्या अजय जयरामने तिसऱ्या फेरीत ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होवर सनसनाटी मात करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या उपान्त्यपूर्व लढतीत अजय जयरामनो कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचे आव्हान 26-24, 21-17 असे 42 मिनिटांच्या झुंजीनंतर मोडून काढले. 

उपान्त्य पेरीत अजय जयरामसमोर जपानच्या सातव्या मानांकित यु इगाराशीचे आव्हान आहे. आणखी एका उपान्त्यपूर्व सामन्यात इगाराशीने तैपेई चीनचा पात्रतावीर हसुए हसुआन याचा 21-17, 21-14 असा सहज पराभव करीत आगेकूच केली. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत भारताच्या मिथुन मंजुनाथसमोर चीनच्या बिगरमानांकित झोऊ झेकीचे आव्हान आहे. 

महिला एकेरीच्या आधीच्या फेरीत जपानच्या शिओरी सैतोचा पराभव करणाऱ्या भारताच्या ऋतुपर्णा दासने तिसऱ्या फेरीत तैपेई चीनच्या सहाव्या मानांकित संग शुओ युन हिच्यावर 21-8, 21-14 असा 24 मिनिटांत विजय मिळवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानने ऋतुपर्णाचा प्रतिकार 21-19, 21-14 असा 29 मिनिटांत मोडून काढताना उपान्त्य फेरीत धडक मारली. 

चायवानने त्याआधी तृतीय मानांकित यिंग यिंग ली हिच्यावर सनसनाटी मात केली होती. उपान्त्य फेरीत चायवानसमोर चीनच्या सातव्या मानांकित हॅन युएचे आव्हान आहे. हॅनने दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत मलेशियाच्या येन मेई हो हिचा कडवा प्रतिकार 20-22, 21-15, 21-11 असा मोडून काढला. त्याआधी महिला एकेरीत मलेशियाच्या क्रिस्टल पॅनने भारताच्या वैदेही चौधरीचा 21-14, 21-13 असा धुव्वा उडविला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)