अजय देवगणला पितृशोक, वीरू देवगण कालवश

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

वीरू हे प्रसिद्ध स्टंट आणि ऍक्‍शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांनी 80 हून जास्त चित्रपटांसाठी ऍक्‍शन कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय “हिंदुस्तान की कसम’ चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. फक्त ऍक्‍शन आणि दिग्दर्शनच नव्हे तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. “क्रांती’ (1981), “सौरभ’ (1979) आणि “सिंहासन’ (1986) या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता. ऍक्‍शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे “फूल और कांटे’, “हिम्मतवाला’, “प्रेम रोग’, “क्रांती’, “दो और दो पांच’ या चित्रपटांना बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते.

वीरू यांना पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाणे फारस पसंत नव्हते. कामाव्यतिरिक्त ते घरत राहणे जास्त पसंत करायचे. त्यांना अजयच्या “टोटल धमाल’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला शेवटचे पाहण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने “दे दे प्यार दे’ चित्रपटाचे प्रमोशन अर्ध्यावर सोडले होते. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)