विमान प्रवासी वाढले; मात्र महसुलात घट 

नागरी हवाई मंत्रालयाची आकडेवारी प्रसिद्ध

मुंबई – देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या सप्टेंबरअखेरीस एक कोटी 13 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील प्रवाशांच्या तुलनेत यंदा 19 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये हवाई प्रवाशांची संख्या 95.83 लाख होती. सर्वच विमान कंपन्यांनी प्रवासदरात मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्याने प्रवाशांच्या संख्येने कोटीची उड्डाणे केली आहेत. म्हणजे प्रवासी वाढले मात्र महसूल कमी झाल्याची परिस्थिती आहे.

नागरी हवाई संचलनालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात उड्डाणांच्या संख्येत इंडिगो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. इंडिगोला मागे टाकून गो एअरने अव्वल स्थान मिळवले आहे. देशातील चार प्रमुख विमानतळांवरून वेळेवर उड्डाण करण्याचे प्रमाण सरासरी 90.4 टक्के असल्याचे दिसून आले आहे. इंडिगोने सर्वाधिक 49.20 लाख प्रवाशांसह 43.20 टक्के बाजारहिस्सा मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्या पाठोपाठ जेट एअरवेजने 16.13 लाख प्रवाशांसह 14.2 टक्के हिस्सा मिळवला आहे. त्यानंतर सर्वाधिक प्रवासीसंख्येत स्पाइसजेट (13.63 लाख), एअर इंडिया (13.45 लाख) यांचा क्रमांक लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंडिगोचे व्यवस्थापन करणारी इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीला जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 652 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ही कंपनी सप्टेंबर 2015मध्ये शेअरबाजारात सूचिबद्ध झाली होती. यानंतर या कंपनीला प्रथमच तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये इंडिगोला 551 कोटी रुपयांचा नफा झाला होता. खासगी विमान कंपन्यांमध्ये इंडिगोचा साधारण 40 टक्के हिस्सा आहे. या तिमाहीत इंडिगोच्या उत्पन्नात मात्र 18 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत इंडिगोला 6,514 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. इंधनावरील वाढता खर्च, रुपयाची घसरण तसेच स्पर्धेमुळे तोटा झाल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)