विमान प्रवास 20 टक्‍क्‍यांनी महागणार

विविध कारणांमुळे अनेक विमाने वापराविना पडून

नवी दिल्ली – आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे बऱ्याच विमान कंपन्यांची अनेक विमाने वापराविना पडून आहेत. त्यामुळे भारतातील विमान प्रवास व्यवस्थेचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या अवस्थेत विमान प्रवास 20 टक्‍क्‍यांनी महाग होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जाऊ लागली आहे.

परवा, इथियोपिया एअरलाईन्सच्या बोईंग 737 मॅक्‍स 8 या विमानाच्या अपघातानंतर या विमानाच्या वापराबाबत साशंकता व्यक्‍त व्हायला लागली आहे. भारताने आता या विमानाच्या उड्डाणांवर बंदी आणली आहे. हवाई वाहतुक संचलनालयाने “बोईंग 737 मॅक्‍स’ विमानांचा वापर ताबडतोब थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या बनावटीची सर्व विमाने ताबडतोब आधुनिकीकरण आणि सुरक्षा उपायांच्या तपासणीसाठी थांबवण्यात येणार आहेत. हवाई वाहतुक मंत्रालयाने एका ट्‌विट संदेशात ही बाब स्पष्ट केली.

यामुळे स्पाइसजेट आणि जेट एअरवेजच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर या कंपन्यांचे शेअर कोसळले. जेट एअरवेजकडे अशी पाच विमाने आहेत. अगोदर 1000 तासांचा अनुभव असलेल्या चालकांनाच ही विमाने चालविण्याची परवानगी महासंचालनालयाने दिली होती. मात्र नंतर ही विमाने चाचण्या पूर्ण होईपर्यंत काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विमानचे लीज भाडे न दिल्यामुळे जेट एअरवेज आणखी चार विमाने थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे आता या कंपनीची 32 विमाने कार्यरत नाहीत. त्यामुळे या कंपनीच्या सर्व वेळापत्रकावर बराच परिणाम झाला आहे.

संचलनालयाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. प्रवाशांची सुरक्षितता सर्वात जास्त महत्त्वाची आहे. त्यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विमान कंपन्या आणि विमान उत्पादक कंपन्यांकडून सुरक्षिततेच्या उपायांबाबत केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहितीही घेतली जात आहे.

रविवारी इथियोपियाच्या 737 मॅक्‍स बोईंग विमानाचा ऍड्डिस अबाबा जवळ अपघात झाला. त्यामध्ये 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार भारतीयांचाही समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये बोईंग विमानाचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात इंडोनेशियामध्येही लायन एअरचे विमान कोसळून 180 जणांचा मृत्यू झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)