‘त्या’ चिमुरड्यांची दिवाळी अंधारात अन्‌ उघड्या माळावर

ऊस तोडणी मजुरांची हृदयद्रावक स्थिती; वाढे विकण्यासाठी मजूरांची भटकंती सुरू

-अर्शद आ. शेख

श्रीगोंदे – एकीकडे नवे कपडे, फटाक्‍यांची आतषबाजी, घरात फराळा सोबत गोडधोड पंचपक्वान अन्‌ विद्युत रोषणाईची धामधुमीत दिवाळी साजरी होत असल्याचे सार्वत्रिक दृश्‍य आहे, मात्र या सर्व घटकांकडे आशाळभूत नजरेने पाहत पोटासाठी राबणाऱ्या ऊस तोडणी मजूर व त्यांच्या चिमुरड्यांचा दीपोत्सव मात्र अंधारात अन्‌ ऊसाच्या फडातच साजरा होत असल्याचे हृदयद्रावक दृश्‍य देखील आहे.

श्रीगोंदा तालुक्‍यात ऊसाचे मोठे आगार आहे. ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्‍यात सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, कुकडी सहकारी साखर कारखाना, साईकृपा साखर कारखाना युनिट एक व युनिट दोन या चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे.यामुळे ऊस तोडण्यासाठी आलेल्या मजुरांची संख्या मोठी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हे कामगार दिवस-रात्र कष्ट करतात.पहाटे 5 ला सुरू होणार त्यांचा दिवस अंधार पडल्यावरच मावळतो. ऊस तोडणे, मोळी बांधणे, गाडी भरणे आदी कामे करीत वाढे (चारा) विक्रीसाठी त्यांची भटकंती सुरू असते.

परिस्थितीशी दोन हात करत त्यांची ही झुंज सुरू आहे. दीपोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. मात्र ऊस तोडणी मजुरांची दिवाळी उघड्यावरच साजरी होत आहे. पालात लावलेला दिवा हाच त्यांचा दीपोत्सव. या भव्य उत्सवाचा आंनद गावात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीकडे पाहूनच त्यांना घ्यावा लागत आहे. नवीन कपडे, फटाके, मिठाई आदीं गोष्टी फक्‍त डोळ्यांनी पाहत ऊस तोडणी मजुरांच्या कुटूंबाला दिवाळी साजरी करावी लागत आहे.

या विदारक दृश्‍याची तीव्रता कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ऊस तोडणी मजुरांच्या परिस्थितीवर फुंकर घालण्यासाठी माणुसकीचे हात पुढे येऊन त्यांना आनंद देत सामाजिक विषमतेची दरी नाहीशी करतील का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)