पारनेर तालुक्‍याच्या उंबरठ्यावर ‘दुष्काळ’

पारनेरला पाणी साठा होत असलेल्या हंगा तलावानेदेखील तळ गाठला आहे. (छाया-शरद रसाळ,सुपे)

पावसाची सर्वच नक्षत्रे गेली कोरडी :दीपावली दुष्काळाच्या सावटाखाली

तालुक्‍यातील धरणांनी गाठला तळ…

तालुक्‍यातील सर्वात मोठे असणारे मांडओहळ धरणाने तळ गाठला आहे. प्रकल्पाची क्षमता 399 दशलक्ष घनफूट मृदसाठा 89 दशलक्ष घनफूट, उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. मात्र त्यातील फक्त 41दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसऱ्या काळू प्रकल्पाची क्षमता 289 दशलक्ष घनफूट आहे. त्यात आज 34 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यानंतर शक्‍यतो पाणी मुळा डॅम किंवा कुकडी या ठिकाणाहून तालुक्‍याला आणावे लागेल, अन्य व्यवस्था करावी लागेल.

सुपे – जिल्ह्यातील काही भाग वगळता आज सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत आहेत. काही दिवसांमध्ये दिवाळी सण आहे. सर्वच नक्षत्र कोरडे गेल्याने नवरात्रीमध्ये पाऊस होईल अशी अपेक्षा होती, मात्र नवरात्रीतदेखील थेंबही पाऊस झाला नाही. पावसाचे दिवस कोरडेच गेले. शासनाने तालुका दुष्काळ सदृष्य परिस्थितीत असल्याचे घोषित केले. काही दिवसांत तालुक्‍यात दुष्काळ घोषित होईल. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे, आणि असेच चित्र राहिले तर यावर्षी महाभयंकर दुष्काळाला पारनेर तालुक्‍याला सामोरे जावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील काही भागात थोडाफार पाऊस पडला, त्यावर आलेली पिकेदेखील आता शेवटच्या घटका मोजत आहेत. तालुक्‍याला मान्सून आला कधी आणि गेला कधी हेच कळलं नाही. तालुक्‍यात शेतीचे मोठे क्षेत्र आहे. सर्व आर्थिक गाडा हा शेतीवर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर न झाल्यामुळे हा गाडा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांबरोबरच सर्व स्तरातील उद्योगधंदे, व्यवसायिक, नोकरदार वर्ग व इतर सर्व घटकांवर झाला.

पारनेर : मांडओहळ प्रकल्पाने तळ गाठला आहे.

तालुक्‍यांमध्ये बाजारपेठा सणासुदीला ओस पडल्या आहेत. शेतीपिकाला देण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. केलेल्या पेरणीतील उत्पादन खर्चदेखील निघणार नसल्याने, होतं ते भांडवलदेखील शेतकऱ्यांनी बी-भरणाला घातलं असल्याने येत्या काळामध्ये शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार अशी परिस्थिती दिसून येत आहे.

प्रशासनाने दुष्काळ गांभीर्याने घेतला का?

टंचाई बैठक पालकमंत्र्याच्या उपस्थित पारनेरला झाली. मात्र, बैठक केवळ नावालाच होती का असा सवाल अनेकांना बैठकीनंतर पडला. टंचाईच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडे कोणतेही दुष्काळाचे नियोजन नसल्याचे आमदार विजय औटी यांनी पालकमंत्र्यांसमोर उघड करून, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जवळपास 9 महिन्यांपेक्षा जास्त दिवस म्हणजे पुढील पावसाळ्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणेपुढे दुष्काळी उपायोजना व दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन असणार आहे. यातच लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. दुष्काळ व निवडणूका यांना एकाचवेळी सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरत कारवी लागणार आहे.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे. चाऱ्यासाठी घेण्यात येणारे ज्वारीचे पीक हे जमिनीला लोळत आहे. हे पीक न आल्यास जनावरांच्या चाऱ्यांचादेखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्‍यातील पाणीसाठे कोरडे झाले आहेत. मागील वर्षी वरूणराजाच्या चांगली कृपा दाखविल्याने आजवर पाणी साठे भरले होते, मात्र आता त्यानेदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्रकर्षाने तालुक्‍याला भेडसावणार आहे. अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात सुरू केलेले टॅंकर अद्याप बंद झाले नाहीत.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतीसाठी पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न असे एकना अनेक प्रश्न सध्या तालुक्‍याला भेडसावत आहेत. त्यामुळे तालुक्‍याची आर्थिक घडी बिघडणार आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते मध्यंतरी थोडाफार पाऊस काही भागांमध्ये झाला, त्या पावसावर पीक घेण्यात आले, त्यात तालुक्‍यात नाशिक कांद्याची विक्रमी लागवड झाली. काही शेतकऱ्यांनी तर पाऊस पडेल या आशेवर कांदा लागवड केली. त्या कांदा लागवडीला हजारो रुपये शेतकऱ्यांनी खर्च केले, मात्र पाऊस पडला नसल्याने 80 टक्के कांदापीक जळून गेले.

या काळात फुलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. दसरा दिवाळीमध्ये फुलांना मार्केट चांगले असते. पण यंदा पाऊस नसल्याने शेवंती, अस्टर, झेंडू या फुलांना देण्यासाठी पाणी नसल्याने सुकलेली फुले बाजारात आली. त्याला दसऱ्याला कवडीमोल भाव मिळाला. उन्हाळ्यात शेवंतीची लागवड करून तिला नऊ महिने पाणी देऊन केलेली मेहनत पूर्ण वाया गेली. फूलशेतीदेखील यावर्षी पूर्ण तोट्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)