ऐन दुुष्काळात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण
विंधनविहिरींना 200 फुटांची अडचण
2008 सालपर्यंत शासनाने विंधन विहिरींच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची तहान भागविली. त्यावेळी या 700 ते 800 फुटांपर्यंत विंधन विहिरी घेण्यात येत होत्या. मात्र भूजल पातळी घटत चालल्याने शासनाने फक्त 200 फुटांपर्यंतच विंधन विहिरी घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे शासकीय विंधन विहिरी घेताना मर्यादा पाळली जात आहे. 200 फुटांपर्यंत पाणी लागल्यास विंधन विहीर चालते. 200 फुटांपर्यंत पाणी न लागल्यास विंधन विहीर घेण्याचे काम थांबविण्यात येत असल्याने विंधन विहिरींना फुटांची अडचण आहे.
नगर – ग्रामीण भागात पाण्याचा महत्वाचा स्त्रोत म्हणून विंधन विहिरीकडे पाहिले जाते. परंतू गेल्या काही वर्षांपासून गावागावात नळपाणीयोजना पोहोचल्याने या विंधन विहिरीचे महत्व कमी झाले आहे.
घरात थेट नळाने पाणी येत असल्याने बोअरवेलकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल दोन हजार विंधन विहिरी आज निकामी ठरल्या आहे. असे निकामे विहिरी दुरुस्त करून त्या पुन्हा कार्यरत केल्या जात होत्या. त्यासाठी तालुकस्तरावर पथके असते.
जिल्ह्यातील शासकीय मालकीच्या या 11 हजार विहिरींपैकी जवळपास दोन हजार विंधन विहिरीत झाडांच्या मुळे अडकल्याने तसेच काही ठिकाणी दगड गोटे पडल्याने त्या बंद झाल्या आहेत. जिल्ह्यात यंदा ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
अनेक ठिकाणी टॅंकर सुरु झाले असून, टॅंकरचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना विंधन विहिरींचा आधार होतो. जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागामार्फत जिल्हाभरात विंधन विहिरी घेण्यात येतात. या विंधन विहिरींवर हातपंप बसवल्याने नागरिकांची तहान भागते.
जिल्हा परिषदेमार्फत एकूण 11 हजारांपेक्षा जास्त विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन हजारांहून जास्त विंधन
विहिरी बंद पडल्या असून, 8 हजार 898 विंधन विहिरी सुस्थितीत चालू आहेत. टंचाई परिस्थिती असल्याने टंचाईच्या निधीतून विंधन विहिरी उभारून त्यावर हातपंप उभारणी कार्यक्रम चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 252 विंधन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या विंधन विहिरींसाठी भूजल सर्वेक्षण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर या विहिरींना जिल्हाधिकारी मान्यता देतात. त्यानंतर या विहिरी घेता येतात. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करताना वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे प्रशासनाला अवघड जाते. अशा ठिकाणी विंधन विहीर घेतल्यास खर्चात मोठी बचत होत असल्याने वाड्या वस्त्यांवर विंधन विहिरींना प्राधान्य दिले जाते. मात्र बहुतांश ठिकाणी वाड्या-वस्त्या अधिकृत नसल्याने विंधन विहिरी घेता येत नाहीत.
बंद असलेल्या विंधन विहिरी चालू होण्याच्या स्थितीतील नाहीत. अनेक विहिरीत हातपंपांना झाडांच्या मुळ्यांनी वेढा घातला आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. तरीही भूगर्भातील पाण्याचा उपसा सुरूच होता. विंधन विहिरींमधील पाणीपातळी उन्हाळ्यात टिकेल का? हे पाहणे महत्वाचे आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा