निळवंडेचा प्रश्‍न तडीस लागावा, यासाठी आपले प्रयत्न – आ. कोल्हे

कोपरगाव – जिरायत भागातील शेतकऱ्यांचे निळवंडेच्या पाण्याचे स्वप्न गेल्या तीन पिढ्यांपासून अपूर्ण आहे. मात्र हा प्रश्‍न तडीस लागावा, असाच आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

तालुक्‍यातील बहादरपूर येथे मूलभूत सुविधा योजनेतून 8 लाख 91 हजार रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत बहादरपूर ते वावी या 16 लाख रुपये खर्चाच्या रस्ता मजबुतीकरण व डांबकरण कामाचे भूमिपूजन आ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात होते. यावेळी पुलवामा येथील भ्याद दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरपंच सुनीता कैलास राहणे यांनी स्वागत केले. निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने बाळासाहेब रहाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कालव्याच्या कामाबाबत खेद व्यक्त केला. त्यावर आमदार कोल्हे यांनी याप्रश्‍नी जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अकोले भागात थांबलेल्या कालव्यांची कामे प्रत्यक्ष पाहणी करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

याप्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन, संचालक अशोकराव औताडे, सुभाषराव आव्हाड, अरुणराव येवले, शिवाजीराव वक्ते, माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, विक्रम पाचोरे, विलास डांगे, निवृत्ती गोर्डे, विक्रम पाचोरे, हौशिराम डांगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.माजी सरपंच कैलास रावण राहणे म्हणाले, दुष्काळी गावांच्या सवलती मिळण्यात आम्हाला खूप कसरत करावी लागते. तेंव्हा या अकरा गावांसाठी वेगळे मंडल अस्तित्वात आणावे, अशी मागणी केली.

आमदार कोल्हे म्हणाल्या, रस्ते, वीज, पाणी या प्रश्‍नांत आपण कधीही राजकारण आणलेले नाही. या भागातील जिरायत शेतीचे नंदनवन व्हावे, यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करून संघर्ष केलेला आहे. निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणणे हे आपले अंतिम ध्येय आहे. हा सावत्र आणि तो सख्खा असा भेदभाव आपण कधीही करत नाही.

शिर्डी-कोपरगाव शहरांना पिण्याचे पाणी घ्यावयाचे आहे. पण ते काही सिंचनाचे पाणी कपात करून नाही, तर धरणात शिल्लक असलेल्या पाण्यातून घ्यायचे आहे. धरण कालव्यांचे प्रश्न सुटावेत, म्हणूनच आपण निधी मिळवतो, तर तो ही का घेतला म्हणून औरंगाबाद खंडपीठात आपल्याविषयी गैरसमज करवून दिला जातो. हा प्रश्‍न सुटण्यासाठीच आपला लढा सुरू आहे. आपल्याला कुणाविषयीही राग नाही. ज्यांच्या मनात गैरसमज आहे, त्यांच्यासाठी केंव्हाही मंत्रालयात जलसंपदामंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याविषयीचे गैरसमज दूर करू. प्रश्‍न निर्माण करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी झाले नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या. रामदास राहणे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)