अटी, त्रुटींच्या नावाखाली चारा छावण्यांचे 84 प्रस्ताव लटकले

File photo....

जामखेड तालुक्यातील शेतकरी छावण्याच्या प्रतीक्षेत; चारा नसल्यामुळे जनावरांचे हाल

जामखेड – तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पशुधनासाठी चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात दाखल चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याऐवजी नियम व अटींचे कारण सांगत लटकत ठेवले आहेत. यामुळे पशुपालकांत चिंता वाढली आहे. फेब्रुवारीत तालुक्‍यातून चारा छावणीसाठी सर्वाधिक 84 प्रस्ताव दाखल झाले आहेत. शासनाने प्रस्ताव दाखल करण्याची मुदत शिथिल केल्याने चारा छावण्यांच्या प्रस्तावांची संख्या अजून वाढण्याची शक्‍यता आहे.

तालुक्‍यात यंदा खरिपासह रब्बी हंगाम हातचा गेला. खरीपात अत्यल्प पावसामुळे काहीच चारा उपलब्ध झाला नाही.रब्बी हंगामाची अत्यल्प पेरणी झाली असून ओलीअभावी वाढ होण्यापूर्वीच पिके वाळली आहेत. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून सांभाळण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. तालुक्‍यात जनावरांना चारा-पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालकांना चारा पाण्याअभावी पशुधन सांभाळणे अवघड झाल्याने बेभावाने विक्री करीत आहेत. पशुधन जगवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व संस्थांनी आवश्‍यक माहितीसह तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, चारा छावणी सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याच सूचना दिल्या जात नाहीत. अनेक पशुपालक व विविध संघटनांकडून चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.

शासनाने छावणीचालकांना घातल्या 40 अटी अडचणीच्या ठरत आहे. छावणीचालकांच्या खात्यावर किमान 10 लाख रुपये शिल्लक व 30 लाख रुपये उपलब्ध करून देण्याबाबतचे हमीपत्र, पशुपालकांचे संमती व स्थानिक तलाठ्याचा दाखला, छावणीत दाखल झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. यासाठी शेतकऱ्यांकडून बंधनपत्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छावणी बंद केल्यास 15 दिवसांचे अनुदान वसुल करण्यात येईल, छावणीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, अटी मान्य असल्याचे 100 रुपयांच्या मुद्रांक पेपरवर बंधपत्र, 300 ते 500 पेक्षा अधिक जनावरांचा समावेश करता येणार नाही, छावणी 30 जूनपर्यंत सुरू ठेवण्यात यावी यासह 40 अटी घालण्यात आल्या आहेत.

“तालुक्‍यातून 84 प्रस्ताव दाखल झाले आहेत.अनके संस्थांनी एकाच नावाने 2-3 प्रस्ताव दाखल केले आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसार एका संस्थेच्या एकच प्रस्ताव स्वीकारावा लागणार आहे. यामुळे दाखल झालेल्या एकूण प्रस्तावातून ज्यांनी जास्त प्रस्ताव दाखल केले आहे. त्याचे नावे कमी होणार असून काही प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याने पूर्ततेसाठी संबंधितांना कळवण्यात आले आहे. शासनाच्या निकषानुसार सर्व चारा छावणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव आल्यास तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे
– विशाल नाईकवाडे ,तहसीलदार, जामखेड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)